पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी नेहमीसारखी ड्यूटीवर होते... मुलं शाळेत गेली होती, तर काळे संस्थेत दत्त. मला राग आला... मनात आलं... आले सुखात विष कालवायला... मी ड्यूटीवर आहे सबब सांगून भेटायचं टाळलं, तर संस्थेबाहेर उभे... ड्यूटी संपून घरी निघाले तर पाठलाग करत आले. मी दम भरला तसे परतले. हे बळ मला संस्थेमुळे आलेलं होतं. संस्था कवचकुंडल होती. यापूर्वी इतरांचे मालक असेच घोळत असायचे... अशांना संस्था, दादा, ताई, साहेब प्रसंगी पोलिसांत द्यायचे, हे मी यापूर्वी पाहिलेलं होतं. ते गेले तसा मी श्वास सोडला... दमले होते म्हणून पाठ टेकली... मुलं शाळेतून येण्याची वाट पाहात होते, तेवढ्यात दादांनी बोलावलं म्हणून सांगावा घेऊन मामी घरी आल्या. आमच्या सर्वांच्या लेखी संस्थेचा, दादांचा निरोप म्हणजे वॉरंटच! अपील नसायचं... वाटेतच मामींकडून कळलं की काळे रडत दादांना भेटले... मला काय होणार हे अंदाजानं उमगलंच. मी धीर एकवटून दादांपुढे उभे राहिले... मान खाली घालून. दादा म्हणाले, “हे काळे, बोला काय ते...!” “मी परत भांडणार नाही... मारणार नाही... सोडणार नाही... हकलणार नाही...' सगळी जुनीच टेप, तरी फरक होता एका वाक्याचा... “हे मी केलं नाहीतर दादा जेलमध्ये टाका मला! निराधार तू नाहीस. मी आहे... मला तुझ्या आधाराची गरज आहे. पहिलीपेक्षा तूच प्रेमाची, हे आता मला कळून चुकलं... वाटलं तर मी सर्वांसमोर पाय धरतो." दादांपुढे मला नाही म्हणणं शक्य नव्हतं... तरी त्यातून म्हटलंच मी, ‘‘पुरे झालं नाटक... चला मुकाट्यानं" माझ्या मागं खरंच मुकाट्यानं आले. वाटेत पोरांना खाऊ घेतला... भाजी घेतली... गोड घेतलं आणि शाळेतून मुलांना घेऊनच परतलो.. पोरं त्यांच्याकडे जाईनात तसे हंबरडा फोडून रडू लागले... काळेच्यात फार बदल झाला होता, असं आठवडाभरात लक्षात आलं. गावची देशमुखी... थाट पार उतरला होता. जाधवबाईंच्या ओळखीनं त्यांनी नोकरी मिळवली ब्रदर म्हणून... गावचं शेत, घर विकलं म्हणाले. चांगलं राहात होते; पण गाडी थोड्या दिवसांत मूळ पदावर आली. दादांना, संस्थेस घाबरत; पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना? एक दिवस नशेत स्वतःला पेटवून घेतलं अन् गेले.

 मी परत एकटीच! मला कुणाचा शाप कुणास ठाऊक... मी लहानपणी पण भरल्या घरात एकटीच असायचे. ताईकडे गेले तरी एकटीच... मला कसला घोर लागायचा कुणास ठाऊक... मला माझा शोध अस्वस्थ करतर राहायचा... अन् मी परत नव्याने एकटी प्रयत्न करत राहायचे... रस्ते

दुःखहरण/९३