पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षही झाले नाहीतर त्यांची माहेरच्या माणसांच्या येण्याजाण्यावरून कुरबुर सुरू झाली. मला काही बोध होईना. तेवढ्यात समजलं की, यांचं गावाकडं पहिलं बि-हाड आहे. शेताचं निमित्त सांगून जायचे... खरं नंतर समजत राहिलं, तशी मी मुलांना घेऊन माहेरी आले.
 मी मुलांना घेऊन कायमची राहायला आले, असं सांगितलं तसं आई, वडील, भाऊ, बहिणी सर्वांनी घर डोक्यावर घेतलं. मला काही कळेचना, आजवर माझी थुकी झेलणारे... ढुंकून पाहिनात की बोलेनात. मला समजत गेलं. जगात आपलं कोणीच असत नाही. गोतावळा म्हटला तर आपला. नाती सगळी सोईची असतात. गरज संपली की, कुल्ल्याला हात पुसून नामानिराळे. सुखात सगळे आपले असतात. दुःखात जोडलेली माणसंच कामाला येतात. हे मी गेल्या पाच वर्षांत संसार केला तसं उमजत गेलं.
 आईचा एकच धोशा होता... पोरं बालकल्याण संकुलात... कोल्हापुरात ठेव... मोकळी हो... हात परत पिवळे करू. मला हे पटत नव्हतं. आईवडील, आजी-आजोबा, कामा-मामा असताना पोरांना अनाथ करायचं मला पटत नव्हतं. मी नाहीच म्हणून बसले. मोठा भाऊपण अंगावर येऊ लागला... ‘आमच्याच्यानं नाय व्हनार' म्हणायचा. दुसरा भाऊ बोलायचा नाही; पण री ओढायचा. एकदा तर सवती (वेगळ) रहा म्हणाले, तसं माझं डोकं फिरलं... मी मुळातच हट्टी होते, हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. मी पण हिय्या केला, नाही राहायचं घरात, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पोरांना शिकवायचं.
 माझा एकच दोष होता. मी कुणाच्याही ओंजळीनं पाणी प्यायचे नाही. कुणावरही अवलंबून राहायचे नाही. अवलंबन म्हणजे गुलामी, असंच मला वाटायचं. मी पोरांना घेऊन बालकल्याण संकुलात गेले. बाईंना भेटले. आई सोबत होती; पण तिची नुसती सोबतच होती... तेवढ्यात तिनं आपलं घोडं दामटायचा प्रयत्न केला... "पोरांना तेवढं ठेवा. मी पोरीचं बघते" मी नाही म्हटलं. “माझ्यासह ठेवा... नाहीतर मी नदीत उडी टाकून मरते; पण घरी नाही जाणार."

 बाई म्हटल्या, “ठीक आहे... ठेवून घेते; पण तुम्हाला पडेल ते काम करावं लागेल." मी 'हो' म्हटलं, तशी आई निसटली. तिचा जीव भांड्यात पडला. मलाही स्वतंत्र झाल्याचा आनंद भेटला. स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगता येण्यासारखे दुसरं स्वातंत्र्य नसतं. वळचणीत राहणं म्हणजे गुलामी.

दुःखहरण/९१