पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/91

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


गेले. भावोजी पहिल्या बायकोकडेच राहू लागले. अधी-मधी बहिणीकडे यायचे; पण राहायचे नाहीत. बहिणीला दिवस गेले म्हणून मी तिच्या हाताखाली आले. दहावीत होते; पण समज कॉलेजची होती... भांडीकुडी, दळप-कांडप, स्वयंपाक-पाणी सारं यायचं... आईचं वळणच तसं होतं... पोरीच्या जातीला संसाराचं सारं करता आलं पाहिजे... असा तिचा आग्रह असायचा. आम्हा तीनही बहिणींना तिनं एकसारखं वागवलं... वळण लावलं होतं... त्यामुळेच असेल कदाचित. आम्ही स्वतःच्या पायावर व स्वतःच्या समजेवर उभ्या आहोत. मी फार शिकलेली नाही; पण मला समजतं लवकर, समज म्हणजे शिक्षण... शहाणपण.
 मी सांगलीत गेले. ताई हॉस्पिटलला ड्यूटीवर जायची. मी मधल्या सुट्टीत डबा घेऊन जायची. गेले की तास दोन तास तिथंच घुटमळत राहायची. तिथं एक ब्रदर होते. मुकुंद काळे त्यांचं नाव. त्यांची नि माझी तिथं ओळख झाली. तसं ते ताईकडे येऊ-जाऊ लागले. ताईची डिलिव्हरी झाली. डॉक्टरांना नर्स हवी होती. ब्रदरनी डॉक्टरांना माझं नाव सांगितलं. मला काहीच यायचं नाही. वेळ जायचा नाही म्हणून मी जाऊ लागले. घरी बहीण शिकवायची. हॉस्पिटलमध्ये ब्रदर. सुरुवातीला मी वरची कामं शिकले. बेड लावणं, औषधं देणं, ड्रेसिंग करणं, रक्त घेणं, सलाईन लावणं करत सगळं शिकले. ब्रदर मदतीला असायचेच, नाईटला एकटी असले की टेन्शन यायचं... कधी कधी नस सापडायची नाही पेशंटची... ताई येऊ शकायची नाही बाळाला सोडून...ब्रदर निरोप दिला की यायचे. डॉक्टरांची भीती वाटायची... ब्रदरचा आधार वाटायचा.

 काही दिवसांनी ताई ड्यूटीवर जॉईन झाली तशी मी गावी घरी आले तर काळेचा फोन वरचेवर यायचा. डॉक्टरांना गरज आहे... मला पण करमत नाही... तुमची सवय झाली म्हणून. पहिल्यांदा मी काही मनावर घेतलं नाही. तसं काळे गावी आले... चलच म्हणून! मी ऐकेना. त्यांनी बहिणीला मध्ये घातलं. मला काही कळेचना... एवढा काय पाठलाग? मग एकदा बहीणच म्हटली की, “ब्रदरना तुझ्याबद्दल वाटतंय... माणूस चांगला आहे. नाही म्हणू नको. त्यांनी मला सोडचिठ्ठी पण दाखवली आहे." मला काहीच कळत नव्हतं. अजून मी विशीतच होते. हो-नाही करत अखेर गेले. त्यांनी मला अकलूजला खोली करून दिली. लग्नाच्या रजिस्ट्रेशनची नोटीस दिल्याचं सांगितलं. मी बहिणीच्या भरोशावर लग्न केलं. दोन मुलं झाली. सासरची माणसं येऊ-जाऊ लागली. माहेरचं पण येणं-जाणं होत राहिलं. काय झालं कुणास ठाऊक. संसार थाटून पाच

दुःखहरण/९०