पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावाच्या घरी गेल्या. काही दिवसांतच त्यांनी प्राण सोडल्यानं विद्याताई व भूषणसाठी संस्थाच एकमेव आधार बनली.
 १९८३-८४ ची गोष्ट असेल. भूषण आमच्या रिमांड होममध्ये आला तेव्हा तिसरी-चौथीत होता. आजीच्या संस्कारांमुळे सत्शील, अभ्यासात हुशार, नीटनेटकं राहणं, कुणाच्या अध्यात नाही की मध्यात. त्यानं संस्थेतल्या सर्वांची मनं जिंकली होती. १९८६ ला आम्ही ‘अनिकेत निकेतन' हे। अनाथ विद्यार्थी वसतिगृह सुरू केलं. त्या वेळी भूषण बापटची आवर्जून निवड केली, ती त्याच्या अंगभूत चुणचुणीतपणामुळे. ‘अनिकेत' मधून तो चांगल्या मार्गाने एसएससी झाला.
 त्याच्याबरोबरची इतरही मुलं चांगल्या मार्गाने पास झाली. सोळा वर्षे पूर्ण झालेली ही मुलं नियमाने ‘अनिकेत निकेतन' मध्ये राहू शकत नव्हती. एवढ्या लहान वयात त्यांना संस्थेबाहेर पाठवणं म्हणजे कळत्या, उमलत्या वयात पुन्हा अनाथ करणं वा वाममार्गाला जाण्याचीच संधी देणं... म्हणून मग आम्ही ‘किशोर अनुरक्षण गृह' सुरू केलं. कल्पना अशी की, मुलांनी शिक्षण घेत घेत कमवायला लागावं... चार-दोन वर्षांत स्वावलंबी व्हावं... ही मुलंही त्यांच्या मर्यादेत प्रतिसाद देत राहिली. भूषण कॉमर्स करत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झाला. दोन-चार वर्षांनंतर स्वतंत्र खोली घेऊन राहू लागला, तसा मी सुटकेचा श्वास टाकला.
 पण त्याच्या आईचा-विद्याताईचा प्रश्न वारंवार डोकं वर काढायचा. त्यांना आम्ही शासकीय महिला आधारगृहातून आमच्या दाभोळकर महिला आधारगृहात आणलं ते भूषणनं आईची औषधपाण्याची सोय पाहायचं मान्य केल्यामुळे. संस्थेत विरोध असायचा; पण मला एक कुटुंब उभं करायचं होतं. मी सर्वांना विश्वासात घेऊन समजावत होतो. अधीक्षिका, काळजीवाहक भगिनींना ते पटायचं; पण विद्याताईंचा स्वभाव, त्यांच्या फिट्स, हट्टामुळे त्या बेजार व्हायच्या. आधारगृहातील अन्य लाभार्थी भगिनींची पण भुणभुण असायचीच. भूषणला इकडं मी समजावत, जबाबदारीची जाणीव देत राहायचो. अधीमधी लग्न कर, असंही सुचवायचो. त्याची अट होती, ‘आईला सांभाळणारी बायको मिळाली तरच मी लग्न करणार. नाहीतर आईला घेऊन राहणार... फक्त घर होऊ दे. मी आईला सांभाळणार.' भूषणच्या जिद्दीचं कौतुक वाटायचं.

 मी संस्थेच्या नेहमीच्या राऊंडवर होतो नि सामंतबाई समोर आल्या... दादा, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. ऑफिसात येऊ का?" “मी राऊंड पूर्ण करतो... मग या' म्हणून काम करत राहिलो अन् विसरून

दुःखहरण/८२