पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/84

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


गेलो. थोड्या वेळानं त्या आल्या... “तुम्हाला माझं सगळंच माहीत आहे. मेघाचं लग्नाचं चाललं आहे. भूषण माझ्या मनात आहे. तुम्ही मध्यस्थी केली तर होईल." मी त्यांना भूषणची अट सांगितली, त्यांना ती माहीतच होती. त्यांनी तयारी दर्शवली तरी मी थोडा वेळ द्या, विचार करतो म्हणालो.
 स्वाती सामंत या आमच्या कन्या निरीक्षणगृहाच्या शिक्षिका. माझ्यापेक्षा मोठ्या. माझ्याबरोबरच पंढरपूरच्या बालकाश्रमातून लहानाच्या मोठ्या झालेल्या. आई जन्म देऊन परागंदा झाल्यावर लक्ष्मीबाईंनी अन्य अनेक मुला-मुलींबरोबर त्यांचा सांभाळ केला. लहानपणी देवी रोगाची बळी ठरलेली ती प्रतिभा... तिला सारेजण बेबी म्हणत. देवी बच्या झाल्या पण साच्या चेह-यावर त्याचे कितीतरी खोल व्रण... बरोबरच्या सगळ्या मैत्रिणी उजवल्या तरी हिचं लग्न जमलं नव्हतं. झुरणाच्या बेबीनं स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवून प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण पूर्ण केलं, मानलेल्या बहिणीकडे गुजरातला जाऊन स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला; पण गुजराती येत नसल्यानं ती कोल्हापूरला आली. तुकाराम विद्यालयात नोकरी मिळाली; पण पगार जेमतेम. त्याच दरम्यान आम्ही १९८३ ला कन्या निरीक्षणगृह केलं होतं. आम्हाला शिक्षिका हवी होती. तेव्हा बेबीला आवर्जून घेतलं. तिनेही मुलींसाठी जिवाचे रान केलं. त्यांचे कट पाहन आम्ही संकुलातल्या मुला-मुलींसाठी सुसंस्कार विद्यालय सुरू केलं. तिथं त्या शिक्षिका झाल्या. कायमची नोकरी मिळाली म्हणून मग आम्ही लग्नाचे प्रयत्न सुरू केले. सामंतांचे स्थळ आलं. दिला बार उडवून. श्रीकांत सामंत मोठे कष्टाळू होते. पै-पै जमवून स्वतःचं घर... मुलगा... मुलगी असा सुखी संसार होता. मुलगा तरुणपणीच गेला. तसं मुलगी मेघाच्या लग्नाच्या काळजीनं त्यांच्या काळजाचंच घर झालं. त्यात नवरा विकलांग झाला. आपण सोसलं... मुलीला घोर नको म्हणून भूषणचं स्थळ त्यांनी हेरलं अन् मुलीचे हात पिवळे करून त्या निश्चिंत झाल्या; पण सामंतांची विकलांगता... रोगग्रस्तता म्हणजे रोज एक नवी लढाई... रोज एक नवा जगण्याचा संघर्ष होता.

 माझ्यापुढे तीन उद्ध्वस्त कुटुंबं होती. लक्ष्मीबाई परित्यक्ता म्हणून पंढरपूर बालकाश्रमात दाखल झालेल्या. आपलं उद्ध्वस्त आयुष्य सावरत त्यांनी बिपिन, विठ्ठल, नलिनी, प्रतिभा, मीरा, सत्यवती, लाडी अशांचं

दुःखहरण/८३