पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून घरात उपेक्षितच राहिली. शिक्षण न झाल्यातच जमा होतं. मोठी झाली वयात आली, तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न झाली तशी विद्या अस्वस्थ, कुढत विचार करत राहायची. मुळात एकलकोंडी विद्या गप्प गप्प असायची. खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. झोप नाही. विद्याच्या आईने तिच्या लग्नासाठी नेट लावला. तिला पत्रिका पाहण्याचा नाद होता. ज्या ज्योतिषाकडे जायची त्याला विद्याच्या आईची दया यायची. त्या ज्योतिषाकडे बेळगावचे रघुनाथ बापट नावाच्या आपल्या मुलाची पत्रिका घेऊन आले होते. त्यांचा मुलगा चांगला होता; पण काही करायचा नाही. त्याची कर्मदशा बदलावी कशी म्हणून ते आले होते. ज्योतिषाचं मन सामाजिक होतं, विद्याचं भलं व्हावं, तिच्या आईचा घोर कमी संपावा म्हणून त्यांनी त्या गृहस्थास सुचवलं की, तुम्ही या विद्याशी तुमच्या मुलाचं लग्न कराल तर तुमची ग्रहदशा बदलेल... मुलाला चांगली नोकरी लागेल. ते गृहस्थ विचार करून आठ-पंधरा दिवसांनी परत ज्योतिषाकडे आले, ते होकार व मुलाला घेऊनच. विद्याला दाखवायचा कार्यक्रम झाला. साखरपुडा झाला. यथावकाश लग्नही झालं. विद्या बेळगावला जाऊन संसार करू लागली. अधू असली तरी आईनं कामाचं वळण ठेवलं, शिकवलं होतं. वर्षा-दोन वर्षांत घरी पाळणा हलला. मुलगा झाला. त्याचं नाव भूषण ठेवलं तेच मुळी मोठी स्वप्नं घेऊन. भूषणच्या जन्मानं घरची गृहदशा पालटली, बाबांना बँकेत नोकरी लागली. शेंगाच्या मिलमध्ये हात मजुरी करणाच्या बाबांना कायमची नोकरी. मोठा पगार, राहायला घर यामुळे काही दिवसांनी भूषणच्या बाबांना विद्या नकोशी वाटू लागली.

 घर फिरलं की घराचे वासे फिरतात... अगदी तसंच झालं! भूषणच्या बाबांनी एक दिवस चक्क विद्या व भूषणला कोल्हापूरच्या एस.टी.त तिकीट काढून बसवलं. ते सज्जड दम देऊनच... “मी तुम्हाला मेलो... तुम्ही मला... परत बेळगावात पाय ठेवायचा नाही. ठेवला तर पाय पण लुळा करीन." विद्याच्या आईनं त्या दमाचा जो धसका घेतला तो शेवटपर्यंत. तिला आधी चक्कर यायची... आता फिट्स येऊ लागल्या. तरी आजी, मामाने विद्या व भूषणला सांभाळलं. ते आजीची थोडी पुंजी होती म्हणून. ती जशी संपली तसा मामाने एकच धोशा लावला... “मी माझ्या मुलाबाळांचे करू की लुळ्या-पांगळ्यांना सांभाळू?" मग आजीनं इकडेतिकडे चौकशी करता समजलं की कोल्हापुरात बालकल्याण संकुल आहे. तशा त्या आल्या होत्या. आम्ही भूषणला रिमांड होममध्ये प्रवेश दिला. आधारगृहात विद्याताई राहू शकतील, असं वाटलं नाही, म्हणून त्यांना शासकीय महिला आधारगृहात प्रवेश द्यायला भाग पाडलं. तशा आजी निश्चिंत मनानं

दुःखहरण/८१