पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोसल्यानंतरचा सूर्योदय


 मीरा आश्रमातल्या इतर मुलींपैकी एक; पण तिचं स्वतःचं असं वैशिष्ट्य होतं. ती लहानपणापासून कुणाच्या न अध्यात न मध्यात. ती दोन-तीन वर्षांची असेल. पोलीस तिला आश्रमात घेऊन आले होते. ती एक हरवलेली, सोडलेली मुलगी होती. आश्रमात एकटीच बसून असायची. बहुदा लहानपणी तिला तिच्या आई-बाबांची आठवण येत असावी. ती शाळेत जाऊ लागली तशी ती मुला-मुलींत मिसळू लागली. हसू-बोलू लागली; पण स्वभाव स्वतःहून न बोलण्याचाच.
 ती सातवीत शिकत असतानाची गोष्ट. वार्षिक परीक्षा जवळ आलेल्या. त्यावेळी पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात रमाकांत तांबोळी म्हणून नवीन अधीक्षक कार्य करत होते. सारे आश्रमीय त्यांना दादा म्हणत. पूर्वी बाबासाहेब जव्हेरी होते. त्यांना बाबा म्हणत. मुली सगळ्या अभ्यास करत होत्या. नि लोल्या नावाची मुकी मुलगी... तिला मोडकंतोडकं तोतरं बोलायला यायचं. ती सौ. वैजयंती तांबोळी (दादांच्या पत्नी) यांच्याकडे शिपाई होती. त्यांना सर्व वहिनी म्हणत.
 ‘सातवीच्या सर्व मुली... दादा... वहिनी... ऑफिस ऑफिस' लोल्याचं तोतरं, तुटकं बोलणं नि हातवारे यांची भाषा साऱ्या आश्रमाला कळायची. झालं साऱ्या आश्रमात गलका.
 “ईऽऽ सातवीच्या मुलींना ऑफिसात दादा-वहिनींनी बोलावलं."

 होय नाही करत सर्व आठ-दहा मुली जमल्या. “तू चल पुढे... मी येते मागे' म्हणत कितीतरी वेळ त्या ऑफिसच्या व्हरांड्यातच उभ्या होत्या. ऑफिसमध्ये जायची भीती शिवाय दादा नवीन आलेले.

दुःखहरण/६९