पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कॉलेजच्या सर्व उपक्रमात भाग... अपंग वसतिगृहात पुढे ठेवलं तर सगळ्या अपंग मुलं... मुली हा धडधाकट म्हणून सगळ्यांचा हा आधार... कुबडी व्हायचा! एका मुलीची चाकाची खुर्ची धरून नेणाच्या सचिनला मी नेहमी पाहायचो! एकदा फिरकी घेतली... ‘‘तिची सायकल सोडत नाहीस रे!" लाजत म्हणाला, “तुमच्या मनात आहे ते माझ्या नाही..." मीच शरमलो...
 हे सारं आठवायचं कारण परवा घडलं. शिवाजी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता... पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून प्रमुख पाहुणे होते... ते आमच्या वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयास भेट देणार होते. संचालक म्हणून माझी तारांबळ, धांदल सुरू होती. तेवढ्यात मोबाईल वाजला म्हणून घेतला. तिकडून आवाज आला, “सर मी सचिन काळेचा वडील... आपण कुठे आहात? सचिनचा हट्ट आहे... तुम्हाला भेटल्यावरच पदवी घ्यायची." मी संग्रहालयात आहे म्हटल्यावर पाच मिनिटांत दोघे हजर... दोघांचे डोळे डबडबलेले... माझं मन भरून आलं... अंगठा मागणारा द्रोणाचार्य आठवला... बाबा सांगते झाले, “सर, सचिन पतसंस्थेत मॅनेजर झालाय... ‘साहेब' झालाय... एम. कॉम.चा फॉर्म भरलाय... एम्प्लॉयमेंट कॉल यायला लागलेत... आरक्षण आहे अपंगांना... नक्की भेटणार सर क्लास वनची नोकरी... खरा साहेब होणार सचिन!"

 ‘मूकं करोति वाचालं, पंगु लंगयते गिरिम्।' हा आठवीत वाचलेला श्लोक... साठी उलटताना तो खरा समजला.

दुःखहरण/६८