पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बेबीनं गल्लीत राहायचं नाही असं ठरवलं. नीतीचे दिवस बदलून गेले. ती मुली-जावयाकडे राहू लागली. घर विकलं तर सुखच सुख. बेबीला सुखानं झोप लागत नाही यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते सत्य आहे. एक अविश्वसनीय सत्य... अनपेक्षित सुखाचा स्वर्ग! आज बेबीला खरंच वाटत नाही. ती स्वतःलाच चिमटा घेऊन खात्री करून घेते. हे दिवस तिचे का म्हणून? बेबीचं आजचं जीवन कालच्या साच्या कष्टाचं चीज म्हणून पाहायला हवं. जीवनावरच्या अविचल श्रद्धेने बेबीला हे दिवस दिले! आई लक्ष्मीबाईचा आधार... सामंतांची संगत... साच्यानं तिचं अनाथपण भरून गेलं. आज एका मोठ्या अपार्टमेंटच्या फ्लॅटवर मी पाटी पाहतो... श्रीमती स्वाती सामंत, शिक्षिका, बालकल्याण संकुल, कोल्हापूर, तेव्हा खरं वाटत नाही. भूषण, मेघा, सामंतबाई आपल्या नातवासह घरी येतात तेव्हा इतिहास तरळत राहतो... या बाईचं बेबीचं... तिच्या सहनशक्तीची सोसण्याची पराकाष्ठा मी पाहिली असल्यानं आश्चर्य वाटतं की जीवनाच्या कोणत्याच प्रसंगी तिनं कुणाकडे हात पसरला नाही... मदतीसाठी जीभ उचलली नाही... आपले प्रश्न आपणच सोडवायचं बेबीच्या अंगवळणी पडलं होतं... जीवनात कधीच तिनं कशाची तक्रार, कुरकुर केल्याचं आठवत नाही. तिच्याकडून शिकण्यासारखं बरंच; पण एक नक्की... जीवनात सतत स्थितप्रज्ञ राहायचं! तेच तिचं जीवन रहस्य होतं.

दुःखहरण/५९