पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तसा तो घराबाहेर राहू लागला. तो घरी रात्री-अपरात्री यायचा. बेबीचा जीव टांगणीला लागलेला असायचा. हल्ली घरी त्यानं सा-यांशीच बोलायचं टाकलं होतं. काहीही विचारा... हाऽ हूऽ शिवाय उत्तर नसायचं. बेबीच्या मनात नाही नाही त्या शंका येत राहायच्या. मित्रही काही विचारलं की, कानावर हात ठेवत. शेवटी बेबीनं संतोषला रामभरोसे सोडून दिलं. हात टेकले अन् व्हायचं तेच झालं. एके दिवशी तो झोपला, तो उठलाच राही. हलवलं तरी उठला नाही अन् मग पाल चुकचुकली. अन् डॉक्टर आल्यावर लक्षात आलं की त्यानं झोपेच्या गोळ्या घेऊन कायमचाच सर्वांचा निरोप घेतला. बेबीवर आकाश कोसळलं. संतोषकडे पाहात ती भविष्याची मनोरथ रचायची. सारी धुळीला मिळाली.
 नातू गेला तशी आजींनी हाय खाल्ली. पाठोपाठ सामंतांची नोकरी सुटली. तसे ते भ्रमिष्टासारखे वागू लागले. उठता बसता चिडचिड करायचे. आई, मुलगा, नोकरी सारं एका पाठोपाठ हातातून निसटत गेलं. बांधलेल्या घराचे कर्जाचे हप्ते तटू लागले, तशी बेबीची पण झोप उडू लागली. त्यातच सामंतांचं आजारपण वाढलं. ते अंथरुणाला खिळले. भरीसभर मुलगी मेघा गुणी पण वयात आलेली. नाही त्या विचारांचा पिंगा बेबीच्या मनात रोज फेर धरत राहायचा. शेवटी बेबीनं नोकरीच्या ठिकाणचा... बालकल्याण संकुलात शिकून मोठा झालेला भूषण हेरला नि त्याला मेघा दाखविली. त्यानं पसंत केली. मेघावर अक्षता टाकल्या तशी ती निश्चित झाली.

 पण बेबीची साडेसाती तिच्याबरोबर संपणार, असे शेजारपाजारचे म्हणत राहिले, तरी बेबीनं जगण्यावरचा विश्वास गमावला नाही. लढल्याशिवाय हरायचं नाही, हे तिनं प्रारंभीपासूनच व्रत म्हणून पाळलं. अन् शेवटी तेच तिच्या कामी आलं. सामंतांची उसाभर करत तिचा जीव मेटाकुटीला यायचा. शीऽ शूऽ ते आता बिछान्यावरच करत. लघवीसंडासमधून रक्त जायचं. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यासारखी रोज स्थिती. डोळ्याला डोळा लागायचा नाही. शेजारचे कोणी मदतीला यायचं राहोच, यांनी घर सोडून जावं म्हणून रात्री-अपरात्री दार वाजव, कौलावर दगड मार,पाणी बंद कर, विजेची वायर तोड- काय नाही केलं शेजा-यांनी? वाळीत टाकल्यागत जमा. शेवटी सामंतांचे हाल बघून तिनंच देवाला साकडं घातलं. 'यांचे हाल पाहवत नाही. त्याची सुटका कर अन् मला पण ने' देवानं पूर्ण ऐकलं तर कोण त्याला पूजणार? त्यानं फक्त सामंतांना नेलं.

दुःखहरण/५८