पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर, साक्षरता प्रशिक्षण प्रमाणपत्र, एम्ब्रॉयडरी कोर्स काय-काय करून आपली पात्रता वाढवायचा आटापिटा केला. परिस्थितीवर मात करायची अक्षय ऊर्जा तिच्यात उपजतच होती. ती तिला आरशात पाहताना मिळायची. तिच्या बरोबरच्या कमी शिकलेल्या मुलींची लग्नं पटापट झाली; पण आश्रमानं बेबीला कधी एक स्थळ काढलं नाही की दाखवलं नाही... आपल्या चेह-यावरचे देवीचे तोंडभर व्रण तिला सतत आरशात पाहताना बजावत राहायचे... या व्रणांवर तुला मात करायची आहे, तशी ती विद्रूप नव्हती दिसत; पण व्रण मात्र लक्षात येत ... हे लक्षात येणंच धोंड होती.
 बेबीची आश्रमात एक मैत्रीण होती सुमन, ती खरंच तिची जिवाभावाची मैत्रीण होती. तिचं लग्न सहज झालं असतं; पण बेबीचं झाल्याशिवाय करायचं नाही, ही तिची भीष्मप्रतिज्ञा. सख्खी बहीण जिथं थांबत नाही तिथं सुमननं थांबावं याचं साच्या आश्रमाला आश्चर्य वाटायचं. बेबीच्या जीवनात उमेद निर्माण करायचं काम जसं सांभाळलेल्या आई लक्ष्मीबाईंनी केलं, तसंच ते या मैत्रिणींनी. माणसाला ऐन उमेदीच्या काळात जगण्याला भावनिक आधाराचं बळ लागत असतं, ते या दोघींनी दिल्याने बेबी देवीच्या दिव्यातून व मानसिक ताण-तणावातून बाहेर पडली.
 लक्ष्मीबाईंनी सांभाळलेली, संस्थेत शिकून मोठी झालेली बिपिन, विठ्ठल, सुमंत अशी मुलं कोल्हापुरात स्थायिक झालेली होती. त्यांचे स्वतःचे संसार, नोकरी होती. भाड्याच्या घरात राहणारी मुलं त्यांनी बेबीला निमित्तानं कोल्हापूरला आणलं. त्यांनी स्वतः धडपडून नोकरी मिळविली होती. तशी ती त्यांनी बेबीला मिळवून देण्याचा चंग बांधला. या दरम्यान कोल्हापूरच्या न्यू शाहूपुरी विभागात एक छोटी शाळा चालायची. तुकाराम विद्यालय तिचं नाव. बी.टी. पाटील नावाचे एक काँग्रेस कार्यकर्ते ती चालवत. त्यांना आपली शाळा चांगली चालावी म्हणून धडपडणारी, कष्टाळू शिक्षिका हवी होती. त्यांनी बेबीला नोकरी देऊ केली नि बेबीची बाई झाली.

 शाळेत आजूबाजूच्या झोपडपट्टीतली, सर्वसाधारण घरातली मुलं या शाळेत येत. शेजारी महापालिकेचीपण शाळा होती. फातरफेकर बाईंनी या मुलांसाठी जिवाचे रान केलं. त्यांना स्वच्छता शिकवली. पाढे म्हणून घेतले. अंकज्ञान, अक्षरज्ञान दिलं. गप्पा, गोष्टी, गाण्यातून शिकवायला बाईंनी सुरुवात केल्यावर मुलं शेजारची शाळा सोडून इथं येऊ लागली. वर्षा-दोन वर्षांनी मोठी मुलं चौथी शिष्यवृत्ती परीक्षेस बसली. यश मिळालं;

दुःखहरण/५६