पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण संस्थाचालक काही पगार वाढवायचं नाव काढेनात, तसं बेबीनं मग त्र्यंबोली विद्यालय, बालकल्याण संकुल इथं काम करत नवे प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश आलं. बालकल्याण संकुलात साक्षरता शिक्षकाचं पद तिला मिळालं. सरकारी वेतनाशिवाय आपल्यासारख्या अनाथ मुलामुलींना शिकवायला मिळतं म्हणून तिला आनंद झाला. इथं तिला पहिलीचा वर्ग मिळाला, तो तिच्या तळमळीनं शिकवायच्या कौशल्यावरच.
 कायम नोकरी मिळाल्यावर वय झालं तरी तिच्या पायावर तिनं उभं राहावं, तिच्या गोतावळ्यातील सर्वांना वाटायचं. सर्वांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं नि बेबीचं लग्न सामंत नावाच्या गृहस्थांशी झालं. तिला भरलं घर मिळालं. सासू, नणंद, दीर, भावजय असा मोठा गोतावळा होता. घर भाड्याचं होतं; पण नवरा कष्टाळू, कामसू होता. परदेशी आणि कंपनीसारख्या नामवंत दुकानात कामाला असलेले सामंत दुकान, टप-या, हॉटेल्स इ. मधून सिगारेट्स, तंबाखू, बडीशेप, गुटखा इ. विकत. पगाराशिवाय विक्रीवर कमिशन असल्याने आख्खं कोल्हापूर शहर सायकलनी पिंजून काढत. लग्न झाल्यापासून त्यांना नि बेबीला (आता ती सौ. स्वाती सामंत झाली होती) आपली मुलं, घर असावं असं वाटू लागलं होतं. पुढे त्यांना पहिला एक मुलगा झाला. मनातील उभयतांचा आनंद त्यांनी ‘संतोष' नाव ठेवून स्पष्ट केला. पुढे मग मेघा झाली. घर झालं व संसार झाला.

 बेबीच्या साऱ्या जीवनाकडे पाहात असताना एक गोष्ट मला सतत अस्वस्थ करत राहते. तिला कधीच काही सहज का मिळालं नाही? संतोषचीच गोष्ट घ्या. तो तिचा एकुलता मुलगा. आपल्या परिस्थितीच्या मर्यादेत आई, बाबा, आजी सा-यांनी संतोषचे लाड पुरवले. तो लाडाकोडात वाढला. शिकला पण आई-वडील त्याला काही मिळाले नाहीत. आईवडील दोघंही नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने दिवसभर घाण्याच्या बैलासारखे काळचक्राला बांधलेले असायचे. संतोष शाळेतून आला की, मित्रांत असायचा. घरी आजी, बहीण असायची; पण संतोषला त्याची पर्वा नसायची. तो मोठा होऊन हायस्कूलला गेला तसं शाळेतल्या तक्रारी वाढल्या. शेजार दीर रहात बेबीचे. संतोषचे रामकाका. त्यांना तो घाबरायचा; पण त्यांच्यापर्यंत आपल्या कुलंगड्या जाऊ नये याची तो पूर्णपणे काळजी घ्यायचा; पण एका मारामारीत त्याचं सारं पितळ उघडे पडलं तसं त्यानं शाळेचं नाव टाकलं. रिक्षावर जातो म्हणू लागला. बसून डोक्यात नाही ते विचार नको म्हणून बेबी, सामंत सर्वांनी मिळून एक रिक्षा गाठून दिली,

दुःखहरण/५७