पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठरलेलं, आपली आई कोण असेल? वडील कोण होते? आता त्यांचं काय!
 बेबी आठ-नऊ महिन्यांची झाली असेल अन् तिला देवी आल्या. अंगभर फोड होते. पंढरपुरात देवीची साथ होती म्हणून आश्रमाच्या अधिका-यांनी तिला कुडूवाडीच्या मोठ्या दवाखान्यात ठेवलं. लक्ष्मीबाई नि उमाबाईंना आश्रमांनी खोली घेऊन दिली होती. तीन महिने उपचारानंतर बेबी बरी झाली; पण कुडुवाडीहून ती परतली तेव्हा सारा चेहरा देवीच्या व्रणांनी भरून राहिलेला होता. लक्ष्मीबाईंना ते आयुष्यभर खात राहिलं होतं. म्हणायच्या, “कार्टीसाठी दिवस रात्र एक केली... पण डाग काही मी वाचवू शकले नाही. जळ्ळे मेले माजं नशीब" म्हणत बोटं मोडत राहायच्या.
 लक्ष्मीबाई आश्रमात बुटकी' म्हणून ओळखल्या जायच्या. अंगाची छोटी चण. नऊवारी साडी. डोक्यावरचा पदर लक्ष्मीबाईंनी कधी ढळू दिला नाही. त्या आश्रमात परित्यक्ता म्हणून आल्या. पोटचं पोर न वाचल्याचं शल्य त्यांनी पंधरा पोरं सांभाळून भरून काढलं. पंकजा, मधुकर, सुमंत, विठ्ठल, बिपिन, मंडोदरी, बेबी, श्रीमती, नीरजा, चित्रा, ललिता किती मुला-मुलींना लक्ष्मीबाईंनी सांभाळलं. साऱ्या आश्रमाला हंडेच्या हंडे पाणी तापवून गरम पाण्याने अंघोळ करण्याचं व्रत लक्ष्मीबाईंनी पन्नास वर्षं तर सांभाळलं असेल. रविवार हा आश्रमातील मुलींचा न्हाण्याचा दिवस. साच्या मुलींसाठी त्या पातेलेभर शिकेकाई चेचून, शिजवून तयार ठेवायच्या. प्रत्येकीचे केस घसाघसा घासायच्या. गरम पाणी रविवार अंमळ जास्तच करायच्या. रोज नऊला संपणारा अंघोळीचा कार्यक्रम रविवारी बारा वाजले तरी संपायचा नाही. नऊला गच्चीत ऊन आलं रे आलं... की साच्या मुली झिंज्या झाडत उनात वाळवत राहायच्या... त्या वेळी मुलींचं सौंदर्य खुललं की लक्ष्मीबाईंची कळी खुलायची... “आता कशी रंभा दिसते... काल भूत बघायचं होतं हिचं." कार्यक्रम एवढ्यावर थांबायचा नाही. लक्ष्मीबाई जेवण आटोपून आल्या की, फणी घेऊन यायच्या. मग ऊवा, लिखा मारायचा सार्वजनिक कार्यक्रम व्हायचा...

 अशा सर्व व्यापातून लक्ष्मीबाई बेबीचं हवं नको पाहायच्या. त्यामुळेच असेल कदाचित, आश्रमातल्या इतर मुली जिथं आठवी, नववीलाच शिक्षणाला रामराम ठोकायच्या तिथं बेबीनं मॅट्रिक प्रयत्नपूर्वक पूर्ण केली होती. तिला डी. एड्. होऊन शिक्षिका व्हायचं होतं; पण अनाथ मुलामुलींना ना जातीचे आरक्षण, ना सामाजिक प्राधान्य, तिनं टेलरिंग कोर्स

दुःखहरण/५५