पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साऱ्या संकटांना पुरून उरणारी स्थितप्रज्ञता


 तसं तिचं शाळेच्या दफ्तरी नाव म्हणाल तर प्रतिभा फातरफेकर असं लंबचौडे होतं. पण आख्ख्या आश्रमाच्यालेखी ती बेबीच होती. लहानपणी आईनं आश्रमात जन्माला घातलं तेव्हापासून आईच्या तोंडी ती बेबीच होती. बेबीला जन्म देऊन आई तिला आश्रमात सोडून निघून गेली. तिला मामा न्यायला आले होते. जाताना तिनं हट्ट धरला म्हणून सिस्टरांनी तिला लक्ष्मीबाईंना सांभाळायला दिलं. तेव्हा बेबी दोन-तीन महिन्यांची असेल. आई तिला सोडून गेली तरी मामा तिच्यासाठी आश्रमात पैसे पाठवत राहायचा. पत्रं पाठवायचा. बेबीला जपा, शिकवा, असं निर्वाणीचं लिहीत राहायचा. हा क्रम बरेच वर्षे चालला होता म्हणे. मग बेबीच्या आईचं तिकडे माहेरी लग्न झालं तसं हा उमाळा केव्हा आटला ते कळालं नाही. आश्रमाला हे काही नवं नव्हतं. तो इथला रिवाजच बनून गेला होता. कुमारी माता, परित्यक्ता, विधवा, विवाहिता अशा कितीतरी भगिनी आश्रमात नित्य येत राहायच्या. कुणाला नातेवाइकांनी, कुणाला शेजारच्यांनी, कुणाला मामांनी, कुणाला मित्रांनी, कुणाला काकांनी फसवलेलं असायचं. ती मुलगी... बाई उजवली जाईपर्यंत मंडळी आश्रमाशी संधान बांधून असायची... भय असायचं... समाजभय अब्रू, प्रतिष्ठा, खानदान अशा काहीबाहीचं भूत प्रत्येकाच्या मानेवर असायचं. एकदा का उतरलं की त्यांच्यालेखी आश्रम शून्य... गरज सरो अन् वैद्य मरो... त्या जन्म दिलेल्या मुला-मुलींचं काय झालं, याचा शोध परत कुणी घेतला असं आठवत नाही. या मुला-मुलींच्या मनात मात्र आयुष्यभराची हुरहुर... झुरणं

दुःखहरण/५४