पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 • 'मी मूक-बधिर, मतिमंद, गतिमंद, अस्थिव्यंग, विकलांग... मला नको विशेष सुविधा, उपचार, संधी?
 • 'मी पोलीस, निरीक्षक, न्यायाधीश, जेलर. आम्ही तुमच्यासारखे सहृदय असतो. पण ते पद, जबाबदारी आम्हास तसं वागायला भाग पाडते. ते आमचं कर्तव्य असतं. फाशी सुनावणं व देणंही आमचं कर्तव्यच! तुम्ही हे केव्हातरी एकदा समजून घ्या.
 • “मी परित्यक्ता म्हणून जीवन जगते यात जर काय माझा काही दोष असेल तर माझं स्त्री होणं, स्त्रियांनी का नि किती सहन करायचं? त्याला काही मर्यादा? पुरुष होणं म्हणजे अत्याचाराचा परवाना का? पोटच्या गोळ्यासाठी सहन करते म्हणजे मी अपराधी ठरते. याला का समाज न्याय म्हणायचा? हे केव्हा थांबायचं? थोपवायचं कुणी?"
 हे वंचितांचं विश्व तुमच्या जगापेक्षा वेगळं असलं तरी ते तुमच्याच जगाचा एक भाग असतं. ते जग तुम्हीच निर्माण केलंय. त्याला त्यांच्याइतकेच तुम्हीही जबाबदार आहात. ते तुमच्याच जगाचं अभिन्न रूप! पृथ्वीचा उपग्रह चंद्र असतो. तसंच चंद्राला डाग असतात म्हणे? चंद्रावर जाऊन बघा. पृथ्वीवरही डाग दिसतात. कोणतंच जग निराळं नसतं. जग जग असतं. माणसं माणसं असतात. हे एकदा का आपण समजून घेतलं की आपपरभेद संपला म्हणायचा! पण अजून तरी तसं घडत नाही, म्हणून निराळं जग जन्मतं अन् माणसं निराळी होतात.
 ‘दुःखहरण'मध्ये वंचित विश्वाचं सम्यक दर्शन घडवण्याचा प्रयत्न आहे. हे काही मुद्दाम त्यासाठी लिहिलं नाही. सन २०१० च्या शेवटाला केव्हा तरी दैनिक 'प्रहार', मुंबईची रविवार पुरवणी ‘कोलाज'चे संपादक मित्र राम जगताप भेटले होते. गप्पांच्या ओघात वंचितांच्या प्रश्न व समस्यांचा विषय निघाला. ते सहज म्हणाले, “तुम्ही 'कोलाज'साठी यांच्याबद्दल एका सदरात सविस्तर नि सलग का लिहीत नाही?" मी अनवधानाने 'हो' म्हटलं. त्याचं एक कारण होतं. मी निवृत्त होणार होतो. सदरासाठी जी उसंत लागते, ती मिळेल असं वाटलं. पण झालं उलटंच. निवृत्त झाल्यावर मी कामात अधिक बुडालो. सदर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ चालवू शकलो नाही.
 ते सदर सुरू होऊन महिनाही झाला नसेल, लोकवाङ्मय गृहाची एक बैठक होती. त्यात याचं पुस्तक व्हावं असं सुचवण्यात आलं. त्यालाही दोन वर्षं उलटून गेली. लेखांना पुस्तकरूप देण्यासाठी व वंचितांचं विश्व