पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सम्यक उभं रहावं म्हणून नंतरच्या सहा महिन्यांच्या काळात सदरासाठी लिहायच्या विषयांची मी यादी करून ठेवली होती. दरम्यानच्या काळात त्या अनुषंगाने अधिकचं लेखन केलं. सन १९९३ मध्ये दैनिक सकाळ, नाशिकसाठी ‘आभाळ पेलताना...' सदरात सहलेखन केलं होतं. त्याची शैली आत्मकथनात्मक होती. त्यातीलही काही लेखन यात समाविष्ट आहे. नावे इ.त बदल न करता आहे तशी देऊन त्या सत्यकथा म्हणूनच सरळ सांगितल्या होत्या. त्या सर्वांचे एकत्रित रूप म्हणजे वंचित कथांचा हा संग्रह ‘दुःखहरण'. यात मी उपेक्षित जीवन लाभलेल्या वंचित जगातल्या दुःख भोगणाच्यांची रामकहाणी सांगितली आहे. पण त्या रडकथा नाहीत. असेलच तर त्या माझ्यासाठी शौर्यगाथा, पुरुषार्थ कथा होत. यातल्या काही चरित्रांचे जीवन; त्याचा शेवट शोकात्म असेल. परंतु लढाई हरूनही एखादा योद्धा 'वीर' ठरतो अशी चरित्रं यात आहेत. वेगवेगळ्या शैलीत त्या सादर केल्या असल्यानं वाचनीय ठराव्यात. पण त्यापेक्षा जर त्या तुम्हास अंतर्मुख करतील, वंचितांचं जीवन सुखद व सुसह्य व्हावं म्हणून कृतिप्रवण करतील तर मला अधिक आनंद होईल.
 वंचित विश्वातील ह्या माणसांच्या तव्हा पाहाल तर तुम्हास आश्चर्य वाटेल. असं जीवन असतं का एखाद्याचं? हे सोसायचं बळ येतं कुठून? यातल्या साध्या कथा, पात्रं सत्य आहेत. काही ठिकाणी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून नाव, गाव, प्रसंग बदललेत. पण त्यातलं सारं जग सत्यच! तुरुंगातले कैदी, त्यांचं भावविश्व, त्यांचे समर प्रसंग, घालमेल, आयुष्यभराची अस्वस्थता सारं वाचताना तुम्हाला वाटत राहील की तासभर डोकं दुखलं तर नकोसं होतं आपल्याला. ही माणसं आयुष्यभर डोक्यात एखाद्या विषयाचा भुंगा नि पिंगा घेऊन जगतात कसे? कोणती झिंग असते त्यांच्या जगण्यात? तेच असतं त्यांचं निराळेपण! जन्म दिलेल्या मुली हरवतात. अज्ञानामुळे शोध घेणं होत नाही. शोध लागतो तेव्हा त्या दत्तक गेलेल्या असतात. मग जन्मदाती त्या धक्क्यानं आयुष्यभर वेडीपिसी. काय असतं एखाद्याच्या पानात वाढून ठेवलेलं? अशा तेवीस एक कथांतून, चरित्र नायक, नायिकांच्या निराळ्या जग-जीवनातून अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, अंध, अपंग, मतिमंद, बहुविकलांग, मूक, बधीर, कुमारीमाता, वेश्या, परित्यक्ता, प्रताडित भगिनी, विधवांचं एक निराळं जग हा कथासंग्रह आपल्यापुढे उभे करतो.
 हे नवं, निराळं आयुष्य समाजापुढे सामाजिक न्यायाचे नवे प्रश्न विचारतं. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांच्या प्रवासात या वंचितांना आपण