पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न. माणसं असतात पण ते त्यांचे कोणीच नसतात. नातं असतं ते क्षणिक, मानलं तर अन् मानेपर्यंतच! जग असतं पण असह्य. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे-
 ‘‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत.
 सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत"
 अशीच स्थिती. एकही धागा सुखाचा नसतो. रोज आत्महत्या करावी असं भोवतालचं विश्व! ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' अशीच परिस्थिती रोज नवं अरिष्ट घेऊन येत असते. सतत चिंता, काळजीचे काळे ढग भरलेलेच! निरभ्र आकाश एक दिवास्वप्नच! निराळ्या जगातील निराळी माणसं, त्यांच्या जीवनकथा, संस्था, कार्यकर्ते पाहात मी साठ वर्षं मागं टाकली तरी तेच जीवन, तीच माणसं, तशीच दुःखं, संस्था सारं कसं जैसे थे. जुनं जग नवे प्रश्न घेऊन जन्मत राहतं. सुटका, मुक्ती ती नाहीच कशी!
 • ‘मी कुमारी माता झाले. सर्वच दोष माझा कसा? शिक्षा मलाच का? तो विश्वामित्र नामानिराळा, उजळ माथा घेऊन फिरतो तरी तो संभावित? मी मात्र पाय घसरलेली. तो सतत सावरत सुरक्षित!
 • ‘मी अनौरस म्हणून जन्मलो म्हणून आयुष्यभर अनाथ, उपेक्षित, कलंकित जीवन जगायचं? जगायचं ते पण आयुष्यभर ‘दुय्यम माणूस म्हणून का? तुमच्यासारखाच जन्मलो ना पण मी? मग मी वेगळा कसा? केवळ तुम्ही म्हणता म्हणून? नैतिकतेच्या तुमच्या कल्पना... आग लागो त्याला! माझा ‘सोशल डी. एन.ए.' तुम्ही ठरविणारे कोण? तुमचा सोशल डी.एन.ए. मी मागितला तर? आहे खात्री त्याची? का फक्त तुम्ही म्हणता ते प्रमाण. हा सामाजिक न्याय आहे का ते फक्त मला सांगा.
 • ‘मी अपंग म्हणून जन्मले. प्रत्येक पाऊल उचलायला तुमच्यापेक्षा जास्त कष्ट लागतात मला. तुमची व माझी बरोबरी कशी होणार? मला नको सवलत, सुविधा, संधी, साहाय्य?
 • ‘मी अंध, अंधाराशिवायचं सुंदर जग मी पाहूच नाही शकत. पावलागणिक ठेच ठरलेली! माझं शिक्षण, जगणं, जग वेगळं, निराळं नको का?
 • ‘आम्हाला बाळ होत नाही यात आमचा काय दोष? बाळ होणं जितकं नैसर्गिक तितकं न होणं पण ना? मग आम्हाला बाळ घ्यायला इतका त्रास का? अनाथ बाळ सहज नको का मिळायला? तो नाही का आमचा हक्क? अन् त्या बाळाचाही!