पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनोगत


 अन्यायाचा वेताळ उतरावयाचा असेल तर...
 तुम्ही सर्वसामान्य माणसं ज्या जगात जगत आहात, ते एक जग आहे. तुमच्या जगात सर्व कसं सुखकर, सुखद असतं. तुमचा सूर्य रोज नव्या आशा, आकांक्षा, संधी, सुविधा घेऊन उगवतो. तो रोज नवं सुख शिंपडत तुमचं जीवन आज आहे त्यापेक्षा उद्या अधिक सुंदर कसं होईल ते पाहात असतो. तुमच्या जगात नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्र सारे असतात. शिवाय जगणं सुसह्य करणारी जात, धर्म, वंश परंपरा, चालीरीती, घराणं, नाती, सण समारंभ, उत्सव सा-यांनी कसं तुमचं जीवन जगावं असं होत असतं. जमीन-जुमला, घर, स्थावरजंगम, दाग-दागिने, घर, वाडे, शेती, सारं तुमचे पूर्वज तुमच्यासाठी साठवून ठेवत असतात अन् ते सारं तुम्हाला लीलया, आपसूक, पैतृक, मातृक, वांशिक संपत्ती म्हणून लाभतं. तुमच्याभोवतीचं तुमचं जग तुम्हाला तुमच्यासारखं दिसतं, असतं, असावंसं वाटतं. यात गैर काहीच नाही. कोण कुंतीसारखं ‘मला दुःख दे' म्हणून वरदान मागेल?
 या तुमच्या जगाशेजारीच दुसरं, निराळं जग जगतं आहे. या जगात काही माणसं जगत राहतात, एक नाइलाज म्हणून त्यांच्या जीवनातला सूर्य रोज काळरात्र घेऊन जन्मतो. या लोकांना नातेवाईक असतातच असे नाही. असले तर ते या लोकांच्या विशिष्ट सामाजिक संकटांमुळे विश्वामित्र होतात. ही माणसं जे वंचित, शापित, उपेक्षित, कलंकित, दुर्लक्षित जीवन जगतात त्याला प्रत्येक वेळी तेच जबाबदार असतात असं नाही. ब-याचदा तरी त्यांचा कसलाही दोष नसताना केवळ समाज परंपरेचे बळी म्हणून त्यांना कलंकित जीवन जगावं, भोगावं लागतं. अनौरस, अनाथ मुलंच घ्या ना, त्यात त्यांचा काय दोष असतो? या निराळ्या जगात आवती-भोवती त्यांच्यासारखीच माणसं असतात. जग असतं. पण सर्वस्वी तुमच्यापेक्षा