पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/121

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


डॉक्टरांकडे नेऊन ड्रेसिंग करून आणलं. दोन टाके पडलेले. नंतर समजलं, की घरात अन्नाचा कण नव्हता. मूल भुकेनं बेजार होतं. रेखाने डाळ, तांदूळ, पीठ बांधून दिलं. जेवून पाठवलं. त्याचवेळी आमच्या शाळेत एक शिपाई भरायचा होता. मी शाळेत शिक्षक प्रतिनिधी म्हणून पुढारपण करत होतो. शिक्षक संघटनेत जिल्हाभर नाव झालं होतं. संस्थेचे सर्व शिक्षक, संचालक मानायचे. हे पाहून मी बिपिनसाठी शब्द टाकला अन् त्याला नोकरी मिळाली; पण नियुक्ती परगावी होणार होती. मी बिपिनला एक गोष्ट सांगितली, “नोकरी लावायचं काम माझं, टिकवणं तुझं. पडेल ते काम कर. कशाला नाही म्हणू नको. संडास धुवायला सांगितले तरी नाही म्हणायचे नाही." बिपिननी ते तंतोतंत पाळलं अन् त्याचं जीवन बदलून गेलं.

 बिपिनमधील हरहन्नरीपणा, प्रत्येक कामातलं कौशल्य, स्वयंपाक, धुणी, भांडी, गवंडी, सुतार, चहापान साच्यातलं तरबेजपणा पाहून संस्थेनं त्याला खेड्यातून शहरात आणलं आणि त्याला स्थैर्य दिलं. दोन मुलं अन् संसार सांभाळत घर घेतलं. शाळेच्या शिपायाचा तो लॅब अटेंडंट झाला अन् बिपिनचा ‘देशमुख सर झाला. त्याची लॅब पाहायला इतर शाळा येऊ लागल्या. सायन्स टीचर्सला रिलीफ मिळाला. बोर्डाच्या परीक्षेचे प्रयोग कुठले येणार ते तो शिक्षकांच्या आधी सांगू लागला. विद्यार्थ्यांत शिक्षकांपेक्षा मान देशमुख सरांचा इतका की हेडमास्तरही त्याला आता ‘देशमुख सर म्हणून बोलावू लागले. शाळेत पोषण आहार सुरू झाल्यावर तर तो शाळेचा ‘फायनान्सर' झाला. शाळेची लाखोंची बचत त्याच्या कष्ट नि काटकसरीनं झाली अन् इमारती उठल्या. बिपिन शाळेतून निवृत्त होताना पायी, सायकल, लूना, स्कूटर करत फोर व्हिलरपर्यंत येऊन पोहोचला होता हे कुणाला सांगून खरंही वाटणार नाही. गाडी आणि माडीचा मालक झालेला बिपिन म्हणजे ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' चा दृष्टांत! या साच्या प्रवासात बिपिननं सचोटी, प्रामाणिकपणा आपला अन् स्वाभिमानही! माणसास मोठेपण येतं ते केवळ स्वप्नांनी नाही तर स्वप्न सत्यात उतरवण्याच्या शक्यतांचं आकाश जो निर्माण करू शकतो, तोच असा पुरुषार्थ दाखवू शकतो. दोन मुलं, दोन सुना, चार नातवंडे व हे नवरा-बायको असं दहा जणांचं कुटुंब आता महिना पाचपन्नास हजार कमावत करोडपती होतं, हे कुणास सांगून पटणारही नाही. एका शून्याचं शतक होणं खरं वाटत नाही.

दुःखहरण/१२०