पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तरायुष्य तरी आश्रमात नको


 “...आई-वडिलांनी रस्त्यावर टाकून दिलं, तरी राष्ट्रपतिपदक मिळविणारा लष्करी जवान पती म्हणून लाभला. वृद्धापकाळात पुन्हा आश्रमात जावं असं वाटत नाही. ते जगणं आता नको वाटतं..."
 मी सौ. शीला ओहळ, जन्मानंतरच मला खड्ड्यात टाकण्यात आलं होतं. वर लिंबाचा पाला टाकला होता. खड्डा लोकांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर होता. माझ्या रडण्यानं लोकांचं लक्ष गेलं. पोलिसांत वर्दी गेली नि पोलिसांनी मी तान्ही असताना पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात आणले. मी लहानाची मोठी तिथेच झाले.
 ज्ञानरूपी वसा मला संस्थेत असताना संस्थेतील व्ही. एस. जव्हेरी व सौ. सुलोचना जव्हेरी, आम्ही त्यांना ‘आई-बाबा' म्हणत असू, त्यांनी दिला. त्यांच्या प्रेमळ सहवासामुळे आमचा आश्रम खरं 'घर' होतं. नाही म्हणायला बनूबाई सुळे - आम्ही त्यांना अक्का म्हणत, त्यांची कडक शिस्त होती. या सर्वांमुळे स्त्रीसुलभ मर्यादेचे सर्व संस्कार आमच्यावर होत असत. माझं शिक्षण सातवीपर्यंतच झालं असेल नसेल, तर माझं श्री. पांडुरंग ओहळ यांच्याशी लग्न करून देण्यात आले. ते निराधार होते. मिलिटरीत होते. बिजवर होते. याची मला व आश्रमाला कल्पना नव्हती; पण त्याचा मला फारसा त्रास झाला नाही.

 मला एक मुलगा व तीन मुली झाल्या. हे अनेकदा युद्धावर जायचे. त्यांना राष्ट्रपतिपदकही मिळालं होतं. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून कोल्हापूरला

दुःखहरण/१२१