पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/120

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आपली आई म्हणून घरी आणलेलं. त्यातच एक दिवस नोकरी शोधायला म्हणून बेबीपण येऊन राहिली. विठ्ठल, त्याची बायको कुसुम, मुलगा दीपक, लक्ष्मी आई, बेबी, बिपिन, त्याची बायको मीरा, मुलगा कैलास असं इतकं मोठं कुटुंब खोतांच्या माडीवरील उतरत्या कौलाच्या ठेंगण्या खोलीत जीव मुठीत घेऊन राहात होतं. माझी उंची सहा फूट असल्यानं त्या खोलीत मला वाकूनच उभं राहावं लागायचं. कसं कुणास ठाऊक, अनुवंश असल्यासारखे लक्ष्मीच्या खोलीत सगळे बुटके. लक्ष्मीबाईंना अख्खा आश्रम तर बुटकीच म्हणायचा अन् बिपिनला बुटक्या. आश्रमाच्या साच्या मुली तर बिपिनला ‘चिंचेचं बुक' म्हणून चिडवून बेजार करायच्या. इथं घरातली परिस्थिती ओढग्रस्तीची होती. विठ्ठल एकटा मिळवणारा अन् खाणारी तोंड आठ. बिपिन लाल्याच्या हातगाडीवर कामाला लागला तसा संध्याकाळी येताना गाडीवर उरलेली भजी, वडे, पाव घेऊन यायचा अन् संध्याकाळ साजरी व्हायची. त्याच वेळी माझी पत्नी रेखाला दिवस गेले होते. तिला कांदा, बटाटा भजी आवडायची म्हणून बिपिन न विसरता घेऊन यायचा. रेखाला त्यानं लहानपणापासून बहीण मानलं होतं. त्याचं प्रेम पाहून भरून यायचं.

 विठ्ठलच्या खोलीत रोजच्या ओढाताणीनं कुरबुरी वाढतच गेल्या. विठ्ठल घाटगे-पाटील कंपनीत वेल्डर होता. त्याला कितीसा पगार असणार? मग बिपिननं शहाणपणानं एक खोली भाड्याने घेतली खरी; पण भाडे भरणंही त्याला जमायचं नाही. खोली कसली, बिनदाराचं खोपटच होतं. चौकटीला दाराऐवजी गोणपाट टांगलेलं असायचं. आसपास वेश्यावस्ती. खोलीत कोणी नसलेलं पाहून आजूबाजूची मोकाट कुत्री, डुकरं, त्यांची पिल्लं आपल्याच बापाचं घर म्हणून यायची नि धुमाकूळ घालायची. भांड्यात तोंड घाल, गुंडाळलेला बिछाना विस्कट हे ठरलेलं. हातभार म्हणून शिकलेली-सवरलेली मीरा धुणी-भांडी करायची. तेवढाच हातभार. एव्हाना बिपिननं हातगाडी सोडून उद्यमनगरात विठूलच्या ओळखीनं उदय इंडस्ट्रीत ड्रिलर म्हणून नोकरी मिळवली. बाबा देशपांडे. घाटगे-पाटील इंडस्ट्रीत नोकरी करीत. त्यांचं एक छोटं मशिनिंग, ड्रिलिंगचं युनिट होतं. एका छिद्राला एक पैसा मजुरीनं बिपिन अहोरात्र काम करायचा. त्याचे कष्ट, ओढाताण पाहावयाची नाही. दरम्यान मी हायस्कूलमध्ये शिक्षक झालो होतो. बिपिनची खोली माझ्या घराजवळच होती. एकदा घरातील ओढाताणीतून बिपिननं मीरावर हात उचलला. उलथनं फेकून मारलं तशी मीरा खोक पडलेल्या, रक्तबंबाळ कपाळावर हात धरून आली. रेखाने

दुःखहरण/११९