पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपटेबाई दूध सरिता केंद्र चालवायच्या. ताई केंद्र उघडायची, साफसफाई करायची. परत बंद करायला यायची. रोज जाताना तिला अर्धा लिटरची बाटली रतिबासारखी मोफत मिळायची. राशनच्या दुकानदारानं महिनाभराचं धान्य द्यायचा अलिखित करार होता. ती सगळ्या घराचं राशन पाळीत न उभारता घरोघरी पोहोचवायची. तिला कुणी पाळीसाठी हटकल्याचं आठवत नाही. शहाबेन वर्षाचं लोणचं घालायच्या. त्यातली एक बरणी ताईसाठीच असायची. पाहुणे आलेत. बर्फाचा तुकडा दे म्हणून ताई बर्फ फॅक्टरीत गेली, तर नोकर सोडाच मालकांनी पण लादी फोडून ताईला बर्फ द्यायचाच. अशा अचाट मनुष्य संग्रहामुळे तिचा बँक बॅलन्स कधी खर्चच झाला नाही. छोट्या-मोठ्या कामाचे ताईला पैसे मिळायचे. ताई ते कधी घरी आणायची नाही, थेट बँकेत भरणा. त्याची काळवेळ नाही, ताई सकाळी आठला पण भरणा करू शकायची व रविवारी पण बँकेतून पैसे मिळायचे तिला. फक्त बँकेत कोणीतरी असलं पाहिजे. चौकीदारापासून चेअरमनपर्यंत तिला कोणीही चालायचं. 'गणपुले काका हे पैसे व पासबुक भरून ठेवा, मी येतो' (येते नाही. कोल्हापूरच्या बायकांची बोली भाषा पुरषी!). ‘मिरजे मामा, डॉलीला बघायला पाहुणे येणार आहेत. पाचशे रुपये द्या, उद्या खात्यातून घ्या' असं चेअरमनला सांगणारी ताई एकटीच. खत, सिमेंट, लाडू, भाजी कशालाच तिला पैसे लागायचे नाहीत. अशी हुकमत तिनं आपल्या सचोटीनुसार निर्माण केली होती. धाकटा मुलगा नववीत असताना शाळेत तक्रार झाली. तिनं मुलाचं नाव शाळेतून काढलं व थेट एका डॉक्टरांच्या एक्स-रे क्लिनिकमध्ये पिंट्याला नेलं. डॉक्टरांना म्हटली, ‘याला तुमच्या हाताखाली ठेवा. तोच अर्ज, तीच ऑर्डर. नोकरी परमनंट इतकी की, त्या डॉक्टरांना आपली फर्म बंद करण्यापूर्वी पिंटूला दुसरीकडे नोकरी लावली. ताईंना सांगून मग कुलूप. नाहीतर बायको घरी खाईल ही डॉक्टरांना भीती.

 एका मुलीचं व दोन मुलांचे शिक्षण, नोकरी, लग्नं, संसार ताईनं हिमतीने केले. आता मात्र सावल्या लांब पडू लागल्यात. तिच्या अंगवळणी पडलेलं सतत काम करणं तिला स्वस्थ बसू देत नाही. तिला कुठं जायची गरज उरली नाही तरी ती पाच किलोमीटरची पायपीट करून रोज दहा उंबरे झिजवणारच. काही वर्षांपूर्वी अचानक माझ्या घरी सोन्याचं वळं घेऊन आली. “तू मुलांचे शिक्षण, नोकरी सगळं बघितलं. मला कसली तोशीश पडू दिली नाही. ही आपली गरीब बहिणीची भेट." असं म्हणत ती देवाचे देवाला, सिझरचे सिझरला देत आली. त्यामुळे ती निष्कांचन असून कांचनभटासारखी जगली. आताशा मुलं, सुना, नातवंडं तिच्यावर खेकसत

दुःखहरण/११२