पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


राहतात. तक्रार एकच, गरज नसताना दहा घरं फिरती ताईचं म्हणणं असतं, “आपल्या गरजेला ते होते. त्यांच्या गरजेला आपण नको का जायला?" ‘‘गरज सरो नि वैद्य मरो' असा स्वार्थ तिला जमत नाही, हेच तिच्या शोकांतिकेचं मूळ आहे.
 ताईनं आयुष्यभर मिळविलेलं गुडविल एखाद्या पारंपरिक पेढीस, पिढीस लाजवेल असं आहे. तिनं आमची घरची भाऊबीज, रक्षाबंधन चुकल्याचा इतिहास नाही. तिच्याकडे नव्हतं तेव्हाही ती घरी कधी रिकाम्या हाती आली नाही व रिकामी कधी परतली नाही. सर्व घरात ती हरकाम्या असून सन्मानित होती, ती तिच्या कर्तव्यदक्षतेमुळे. तिला कुठल्या घरात मी बाई (कामवाली) म्हणून बोलविलेले मी पाहिले, ऐकले नाही. आता तिला ऐकू कमी येतं. दिसतंही अंधूक. ती लांब राहायला आलीय, स्वतःचं घरबांधून; पण जुन्या गल्लीच्या गोतावळ्यात ती कधी गेली नाही, असा दिवस नाही. नव्या कॉलनीत ती रुळली नाही. म्हणते, “इथली घरं सुट्टी सुट्टी, माणसंही तशीच सुटसुटीत. घराला घर लागून असेल तरच माणसास माणूस जोडून राहतो." तिचं हे निरीक्षण, हा निष्कर्ष एखाद्या समाजशास्त्रज्ञाला लाजवेल असा.
 ताईच्या घरून हल्ली मुलांचे, सुनेचे फोन असतात. ‘ताईला सांगा, सुखानं एक जागी बसून खा.' मी मात्र अजून जाऊन ताईला ते सांगू शकलो नाही. मला माहीत आहे, मी सांगितलं तर ती निमूट ऐकणार; पण कदाचित ती निमूटपणे जगाचा निरोप घेणार हेही मला माहीत आहे. आज ती तळमळत, तडफडत दिवस घालवते आहे. बंद पिंज-यातील पक्षी अधिक फडफडतात... ताईचं तडफडणंही तसंच! तिकडे जुन्या गल्लीत मात्र चैतन्य हरवलंय... ताई जायची बंद झाल्यापासून तिथली घरं पण सुट्टी सुट्टी झाली. माणसं पण!


दुःखहरण/११३