पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलंही मोठी झाली. मी शिक्षक झालो. तिची मुलं माझ्याच शाळेत शिकू लागली. असं पुलाखालून पाणी वाहात राहिलं; पण कोंडीची कोंडी सुटली असं कधी झालं नाही. एखाद्या माणसाच्या जीवनाची वाताहत निरंतर होत राहते, त्यात कधी-कधी सरळ, सत्शील मनुष्य भरडत राहतो. त्याची सभ्यता हीच त्याच्या शोकांतिकेचं कारण बनून राहते.
 कोंडीताईचं जीवन याचं मला व्यवच्छेदक उदाहरण वाटत आलं आहे. तिचं लग्न उशिरा ठरलं यात तिचा काहीच दोष नव्हता. संस्थेचे दुर्लक्ष व तिचं मुखदुर्बळपण. उषाच्या प्रकरणात करेल तो भरेल म्हणत ती सोसत राहिली. अन् हे सगळं करत तिनं आपला गोतावळा जमा केला. मला आठवतं, उषाच्या प्रकरणाच्या काळात भावोजी घरी फिरकत नसत नि पैसेही देत नसत. कोंडीताई राधाकृष्ण मंदिर झाड, तिथल्या उपाध्येंचा केटरिंगचा व्यवसाय होता, तिथं हात लाव. शेजार-पाजारची मुलं बालमंदिरला पोहोचव. याचं दळपकांडप कर. त्याचं रेशन आणून दे. हिचे पापड लाटून दे. तिच्या सुनेच्या बाळंतपणात तेलपाणी कर. बागलांच्या मुलांचं लग्न ठरलं, तर महिनाभर लग्न घराची पडेल ती कामं कर. दवाखान्यात पेशंटच्या सोबतीला नाहीतर बसून काढ. चहा, शिरा पोहोचव. अडत दुकानात दिवाणजी नाहीतर फोन, निरोप घे; पण कोंडीताईंनी कुणाकडे हात पसरलेला कुणी पाहिलेला असेल तर शपथ. ती सगळ्यांची ताई होती. सा-या गल्लीची दाई होती. बायाबापड्याची ही माई प्रत्येकाच्या घाईचा हात होती.
 केवळ या तिच्या कष्ट व प्रामाणिकपणावर भले-भले विसंबून असत. प्रत्येक लग्न घरातली कोठी सांभाळायची कोंडीताईंनी. रक्ताच्या पाहुण्याला निमंत्रण चुकेल; पण कोंडीताईला निमंत्रण मिळालं नाही, असं व्हायचं नाही. गल्लीतलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्याचा दरवर्षीचा दहा दिवसांचा सारा पसारा सांभाळायला मंडळाला ताईच लागायची. तिचं हे सार्वजनिक ताईपण प्रत्येक घरातल्या चुलीपर्यंत पोहोचलेलं होतं. कोणी कुठं परगावी, यात्रेला, विदेशाला जावो कोंडीताईला तिथून भेट आणली नाही, असं कधी झालं नाही.

 पुढे भावोजी वृद्ध झाले नि कॉटवरच बसून असायचे. ताई त्यांचे सर्व करायची; पण तिनं नवच्याविरुद्ध कधी कुणाकडे ब्र काढला, असं कधी झालं नाही. दोन मुलं, एक मुलगी ताईनं बिनपैशाची वाढवली, शिकवली हे कुणाला खरं वाटणार नाही. तिला जगायला पैसे लागायचे नाहीत.

दुःखहरण/१११