पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कोल्हापूरला एक साबणाची कंपनी होती. त्या कंपनीचे एजंट माल विकायला खपवायला म्हणून पंढरपूरला येत असत. त्यांची आषाढी, कार्तिकी वारी चुकली असं कधी झालं नाही. असेच एकदा ते वारीवर आले असताना संस्थेत आले होते व त्यांनी आपणाला संस्थेतील मुलगी करायची इच्छा व्यक्त केली. मंगेश काळे त्यांचं नाव. काळेशे, उंच, सडपातळ गृहस्थ. जैन कुटुंबातील. घरात कर्मठ वातावरण, जैन घरातीलच मुलगी करायची होती त्यांना; पण मुली त्यांना रंगामुळे पसंत करत नसत. घरी वृद्ध आई होती. घरात पूजाअर्चा, सोवळे-ओवळे, शिवाशिव पाळली जायची. त्यांना कामसू मुलगी हवी होती. आश्रमाने कोंडीताईला दाखवलं. दोघांची वयं वाढली असल्यानं दोघांनी एकमेकांना पसंत केलं ते पदरी पडलं पवित्र झालं या भावनेनं. कोंडीताईचं लग्न होऊन ती कोल्हापूरला राहायला आली तेव्हा मी आठवी-नववीला असेल. शाहपुरीतील आंतर भारती विद्यालयात (आत्ताची वि. स. खांडेकर प्रशाला) शिकत होतो. आमच्या शाळेजवळच कोंडीताईचं घर होतं, असं लक्षात आल्यावर जाणं येणं होत राहायचं. तिला दोन मुलंही झाली. आम्ही घरी जात असू तेव्हा सासूच्या धाकाने कोंडीताई जरा जपूनच आमचं आगत-स्वागत करत राहायची; पण तिच्या प्रेमात खोट नसायची.
 पुढे तिची सासू वृद्धापकाळानं वारली. अन् घरी काही दिवसांनी जाणं झालं तेव्हा घरी आश्रमातली नर्सिंग करणारी उषा नावाची एक मुलगी पाहून आश्चर्य वाटलं. नंतर कळलं की, ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून नोकरीस लागली आहे. तिची सोय होईपर्यंत घरी राहायला आली आहे. काही दिवस असेच गेले नि ताई नाराज, उदास, अबोल दिसायची. खोदून विचारल्यावर कळलं की काळे उषाला घेऊन राहतात. घरी येणं कमी झालंय. पदरातील दोन मुलांची आबाळ होते. पैसे मागितले की चिडचिड करतात... अशा अनेक तक्रारी... इतके दिवस आनंदी, उत्साही पाहिलेल्या कोंडीताईचं ते हरलेलं... हबकलेलं रूप... विश्वासच वाटायचा नाही. आम्ही इतके लहान होतो... अभय, मूर्ती, मी... काही करू शकायचो नाही. सहानुभूती दाखवणं इतकंच आमच्या हाती होतं.

 पुढे मी, अभय, मूर्ती आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिकायला गेलो, तसं कोंडीताईचा संपर्क तुटला; पण अधी-मधी खुशाली कळत राहायची. नंतर उषाच्या नवव्यास हे कळल्यावर त्यानं बदली करून घेतली तेव्हा कोंडीताईची सुटका झाली व काळे मूळ पदावर आले. दरम्यान तिची

दुःखहरण/११०