पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डाग नसलेला चंद्र


 मी सौ. रेखा सुनीलकुमार लवटे. पूर्वाश्रमीची रेखा श्याम राव. या पूर्वाश्रमीत एक शब्द लपला आहे आश्रम आणि तोच मनाला बोचतोय. मी खरोखरच पूर्वी आश्रमात राहिले आहे. अनाथपणाचे ओझे घेऊन. दुःखात सुख एवढेच की, माझी आई, सासू, पती सारेच माझ्यासारखे असल्याने आम्ही अनाथाचे आता सनाथ झालो आहोत.
 मला असं सांगितलं गेलंय की माझा जन्म कुमारीमातेच्या पोटी झाला. आईविषयी मला जी थोडीफार ऐकीव माहिती आहे, त्यावरून मी सोनार घराण्यातली होती, पूर्वी माझे नाव रेखा वयुडे होते म्हणे; पण नंतर मला दोन महिन्यांची असताना आई आश्रमात सोडून गेली आणि माझा सांभाळ आश्रमातील मेट्रन सिस्टर पी. राव यांनी केला नि माझे नाव रेखा श्याम राव असे झाले व तेच शाळेत लागले.

 मला माझी खरी आई-जन्मदाती आई काही आठवत नाही व तिची कधी आठवण झाल्याचेही स्मरत नाही; पण या सांभाळलेल्या आईने माझे इतके केले की खरं तर तीच माझी खरी आई वाटते. पंढरपूरच्या बालकाश्रमात आईबरोबर माझं सारं बालपण गेलं. शिक्षणही तिथेच झाले. मी आश्रमात असले तरी आईबरोबर स्वतंत्र राहात असे. त्यामुळे आश्रमातील माझ्या इतर मैत्रिणींना जो त्रास व्हायचा, जे सोसायला लागायचं ते मला मात्र सोसावं लागलं नाही. आश्रमाच्या चार भिंतीत मी सनाथ होते आईमुळे. बाईंनी (सिस्टरांनी) माझ्याबरोबर आणखी एका मुला-मुलीचा सांभाळ केला होता. वनमाला राव. ती माझी मोठी बहीण झाली. रमाकांत राव.

दुःखहरण/१०१