पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तो माझा मोठा भाऊ झाला. घरात भाऊ, बहीण, वहिनी, भावोजी, भाचे, पुतणे सगळे आकारले ते आईमुळे. आईंनी आम्हा सर्वांची शिक्षणे, आजारपण केलं, संसार थाटून दिले. हे सारं चार भिंतीत ठीक होतं; पण समाजाच्या, जगाच्या दृष्टीने मी अनाथच होते. मी आश्रमातील मैत्रिणींबरोबर शाळेत, फिरायला, सिनेमाला जात असे. रस्त्यातून जाता-येता कोण हेटाळणी व्हायची. माणसाच्या जीवनात नुसतं भौतिक सुख असून चालत नाही. सर्व असून नसल्यासारखं वाटायचं. माझ्यात माझ्याबरोबरच्या मैत्रिणींमध्ये काहीच कमी नव्हतं. कमी होतं ते फक्त ‘अनाथपण' त्यात माझा काय दोष, अपराध होता?
 मी दहावीत असतानाची गोष्ट. मैत्रिणींची टक्कर झाल्याचं निमित्त झालं. मी माझा एक डोळा दुखावला. ते दुखणं आजही अधी-मधी अंगावर येतच आहे. दृष्टी जाऊन अंधत्व येणार या भीतीने मी गारठलेले; पण आश्रमांनी नि विशेषतः आईंनी त्या वेळी ज्या खस्ता खाल्ल्या त्या जन्मदात्या आईनेही पण खाल्ल्या नसत्या. अनाथपणाबरोबर अंधत्वाचे व्यंग आलेले पण निभावून गेले.
 आईची निवृत्ती जवळ आली. पोटच्या गोळ्याप्रमाणे तिने माझा अठरा वर्षे सांभाळ केला नि आता परत ‘अनाथ' करायचं तिच्या जिवावर आलं म्हणून तिनं निवृत्तीपूर्वी लग्न व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केले. शिक्षणात माझी फारशी गती नव्हती. शिवणकाम, स्वयंपाक, गायन यात मला अधिक रस होता. त्यामुळे लग्नाचा विचार पक्का झाला.
 माझ्यापूर्वी ताईचं लग्न झालेलं. तिच्यासाठी आईंनी सुशिक्षित घरदार, नातेवाईक, सामाजिक प्रतिष्ठा, मोठा पगार आदी सर्व पाहून स्थळे पाहिलेली. अनुभव जो पाठीस आला तो इतकाच की ताईत सारं काही असून ती 'केवळ' अनाथ होती म्हणून ‘सारं मुसळ केरात गेलं' नि ती तिच्या वाट्याला फार मोठे नैराश्य आलं; पण ती जिद्दीची. तिनं ते निभावून नेलं. मला ते पेलेल असे न वाटल्यावरून आईंनी, आश्रमाचे अधीक्षक रमाकांत तांबोळी यांच्या सल्ल्याने माझे लग्न आश्रमातल्या शिकून सवरून मोठा झालेल्या एका मुलाशी करायचे ठरवले नि तसे ते झाले.

 सुनीलला मी लहानपणापासून ओळखायचे; पण त्याच्याशी लग्न होईल असे कधी वाटले नव्हे. माझे लग्न झाले तेव्हा ते हायस्कूलमध्ये

दुःखहरण/१०२