पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


या संस्था या व्यक्तींना माया देतात, प्रेम देतात. एकमेकांना जगण्याचे बळ देतात. उभे करतात. एका अर्थाने या माणसांना अस्मिता (Identity) देण्याचे काम या संस्था करतात.
 ‘दुःखहरण'मधील लेखनामागे उभ्या असणाच्या जीवनदृष्टीचाही इथे विचार करायला हवा. मानवी जीवनाकडे पाहण्याची एक उन्नत मानवतावादी जीवनदृष्टी यामागे आहे. ती केवळ करुणेची व अकारण प्रदर्शनखोर वृत्तीची नाही. स्वतः लेखक या वंचितांच्या जगातच घडलेला आहे. आपल्या कर्तृत्वाने काहीएक लौकिक प्राप्त केल्यानंतर तो या जगापासून वेगळा झालेला नाही. त्यापासून स्वतःला छाटून घेतलेले नाही. त्यांचा लागाबांधा भूतकाळातील या जगाशी घट्ट बिलगलेला आहे. त्यामुळेच वर्तमानातही त्याचे कृतिशील स्वरूपाचे मानसविश्व त्यांच्या जगाचा विचार करते. त्यात ते आतून सहभागी होतात. आस्थेवाईक ममत्वाने या जगाला ते आपलेसे करतात. त्यामुळेच या माणसांचे जग त्यांनी नेहमीच प्रेरक व विधायक दृष्टीनेच चित्रित केले आहे. मानवी कळवळ्याच्या आंतरिक तळमळीतून ते प्रकटलेले आहे. त्यामुळेच उपेक्षित जीवन लाभलेल्या वंचित जगातल्या दुःखभोगाचे चित्रण हा या लेखनाचा केंद्रवर्ती विषय आहे.
 दस-या जगात काहीच निश्चित असत नाही. निश्चित एकच असतं. परिस्थिती कितीही आकाश फाडणारी असो, आकाशालाही टाका घालण्याची शक्ती, शक्यता सतत एकवटत राहायच्या या प्रयत्नातून हे जीवनचित्रण झालेले आहे.
 लेखकाने हे सारे लेखन ब-याच वेळा तृतीय पुरुषी निवेदनात केले आहे. तो प्रत्यक्ष त्यात सहभागी आहे. मात्र तटस्थपणे मानवी कळवळ्यापोटी केलेले हे निवेदन आहे. तर काही वेळा त्या त्या लेखातील पात्रेच आपल्या मनोगतातून व्यक्त होतात. रुक्मिणीहरणासारखा लेख पहावा म्हणजे ही बाब लक्षात येईल. स्वतःवर ओढवलेल्या घटनाप्रसंगाचे, त्याच्या मानसिक स्थितीचे व दृष्टिकोनाचे प्रकटीकरण या पात्रमुखी निवेदनातून सरस असे उतरले आहे. या विविधस्वरूपी निवेदनात मोठ्या प्रमाणात आत्मपरता आहे. ओघवती कथनशैली आहे. संवाद आहे. हिंदी-मराठी वाक्यप्रयोगांची संमिश्र भाषारूपे आहेत. 'दुःखहरण'मधील व्यक्तिचित्रणात विस्ताराच्या अधिकच्या शक्यता होत्या. मात्र वर्तमानपत्राच्या मर्यादित अवकाशाच्या जागेमुळे त्यांना आटोप प्राप्त झाला आहे. जागेच्या मर्यादेमुळे ती अधिकाधिक बंदिस्त केली गेली आहे.