पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या संग्रहातील सर्वच लेख व्यक्तीविषयक असल्यामुळे या सा-या शक्ती ठळकपणे अधोरेखित झाल्या आहेत. त्यांच्या बाह्यवर्णनाबरोबरच विशेषतः परिस्थितीच्या गडद सावटाखाली वावरल्यामुळे होणारी त्यांची घुसमट प्रत्ययकारीरित्या साक्षात झाली आहे. त्यांच्या दुःखाच्या, अभावाच्या जगापासून ते लढायापर्यंतचा कणखर प्रवास साकार झाला आहे. पंढरपूरच्या आश्रमातील वयोवृद्ध लक्ष्मीबाईसारख्या अनेक व्यक्ती या लेखनात आहे. तिचे दररोज शंभर-दोनशे भाकया बडवण्यापासून ते आश्रमातील साच्या मुलींना न्हाऊ घालण्यातील तिची मनःपूर्वकता फार वेधकपणे साकारली गेली आहे.
 या लेखनाचे मोल सामाजिकदृष्ट्या फार महत्वाचे आहे. आपल्या समाजाची या वंचिताच्या जगाकडे पाहण्याची दृष्टी फारशी निकोप नाही? ती काहीशी दुषित आहे. या माणसांना आम्ही मनुष्यत्वाची वागणूक देत नाही. लेखनातील हा संदेश या वाचनाची महत्त्वाची फलप्राप्ती आहे की ते या जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी करून देते. वाचक या लेखनसंस्काराने आतून बदलतो. आधीचे संस्कारठसे पुसले जातात. त्याच्या जीवनभानात फरक पडतो. निकोप समाजमन वाढीसाठी या प्रकारचे लेखन उपयुक्त ठरते. समाजशिक्षणासाठी या लेखनाचे महत्त्व फार आहे. म्हणूनच लेखकाने म्हटले आहे की ‘नवसमाजरचना व नवसमाजमन तयार करण्याच्या प्रयत्नातील हा एक खारीचा प्रयत्न आहे. समाज जसा कृपण आहे तसाच तो कृतज्ञही आहे. निराश्रितांना आधार मिळावा. त्यांची माणूस म्हणून प्रतिष्ठापना व्हावी. यातून सुजाण समाज घडावा अशी कळकळीची भावना यामध्ये आहे. उद्याच्या सुंदर दिवसासाठी हे एक प्रकारे समाजाचे समुपदेशनच आहे.
 एकंदरच सुनीलकुमार लवटे यांच्या ‘दुःखहरण'मधील व्यथाकथा वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. वंचितांच्या, पीडितांच्या शोकात्मकथा आहेत. तसेच दुर्दैवशरण माणसांच्या लढाईच्या कहाण्या आहेत. जगण्याविषयीच्या ओढीने ते परिस्थितीवर स्वार होऊन यशस्वी होतात. बिंदू-बिंदूतून सिंधू शोधण्याची ही दृष्टी आहे. या माणसांच्या जगण्यातील दुःखहरणाची जीवनदृष्टी यामध्ये आहे. समाजमीमांसा आहे. या सत्यकथेमागे दडलेल्या कारणाचा शोध आहे. आणि लेखकाच्या दृष्टीने तो आपणच गुजरलेल्या आयुष्याचा तो पुनर्णोध आहे. या पुनर्णोधाच्या अनेक वाटा या कथांमध्ये आहेत. निकोप समाजमनाच्या घडणीसाठी या प्रकारच्या लेखनाची उपलब्धी मराठी विचारविश्वाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे.

- रणधीर शिंदे