पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपले मार्ग शोधतात. म्हणून या लेखनातील नायक-नायिका सतत नवे जग आपलेसे करतात. ती केवळ कुढत बसत नाहीत. अशा माणसांच्या या शौर्यगाथा आहेत.
 यातील अनेक माणसे दुःसह अडचणींवर, संकटांवर मात करून यशस्वी होतात. मूकबधीर सचिन आंतरिक ऊर्जेने अपंगत्वावर मात करून बँकेचा मॅनेजर होतो. बहुविकलांग वल्लरी एम. ए. संस्कृत मध्ये पहिली येते. चेह-यावर व्रण असणारी बेबी शिक्षिका होते. शरीरात भिन्नलिंगी झालेले बदल स्वीकारून वासंती नगरसेविका होते. बिपिन शून्यातून करोडपती होतो. अशा निराळ्या जगातील या माणसांच्या यशोगाथा या कहाण्यातून मांडल्या आहेत.
 ‘दुःखहरण'मधील लेखनाला मोठा सामाजिक संदेशही आहे. पराकोटीच्या अभावाच्या जगातून ही माणसे यशस्वी होतात. जिद्द, चिवटपणा व अदम्य इच्छेच्या बळावर ते जीवन तारून नेतात. ‘कोशिश करनेवाले की कभी हार नहीं होती, मैं नही, मेरा काम बोलेगा' यावर श्रद्धा असणा-या माणसांचे हे जग आहे. शून्याचे शतक होतानाचे विश्व या लेखनात लवटे यांनी उभे केले आहे.
 लवटे यांच्या लेखनाचा आणखी एक महत्त्वाचा अक्ष म्हणजे, या चित्रणविषयात अध्याहृत असणाच्या निराधारांविषयी काम करणाच्या संस्थांविषयीचा. वंचितांच्या या जगाला खराखुरा आधारवड असतो तो या संस्थेचा. या संस्था लोकांना आश्रय देतात. सगळ्या जगाने हेटाळलेल्या माणसांची वाढ या संस्थांमध्ये होते. म्हणून या चार भिंतींच्या आतले विश्व त्यांना प्रेममय वाटते. या माणसांत आत्मविश्वास आणि बळ देण्याचे काम त्या करतात. त्यांचे भरणपोषण करतात. उपजीविकेबरोबरच त्यांच्या मानसिक घडणीचाही विचार संस्थांमध्ये होतो. म्हणूनच मला समजून घेतलं असतं तर' मधील नायिका म्हणते, संस्थेत माझं जीवन बदललं. माणूस चुकतो, पण चूक पोटात घेऊन सुधारण्याचा मोठेपणा न समाज दाखवतो न घर. त्यामुळेच संस्था स्वर्ग वाटते ती माणसाला त्याच्या नरकयातनांतून सोडविण्याच्या तिच्या निरपेक्षतेमुळे. बालकाश्रम, अर्भकालय, आधारगृह, अनुरक्षणगृह या संस्था या व्यक्तींना आधार देतात. अनाथांना सनाथ करतात. म्हणून या संस्थांच्या कामाविषयीचा कमालीचा कृतज्ञताभाव या लेखनात आहे.
 या वंचितांचं जग सुसह्य करण्यात या संस्थांचा मोठा वाटा आहे. या संस्थांमधील आजूबाजूच्या सोबत्यांवर त्यांचे मैत्र जमते ते विकसित होते.