खरोखर यातनेचा जो भोग माणसांना भोगणे भाग असते त्याला अर्थ असतो का? निरर्थक आणि निष्कारण अशी व्यथा न बोलावता येते आणि अस्तित्वाला मिठी मारून बसते. तो खिळा जेव्हा मर्म भेदून जातो त्यामुळे तरी जगण्याला काही अर्थ येतो का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? एका अनोळखी अशा ध्रुवावर जिथे नेहमीच रात्र असते ती न संपणारी रात्र असते. तिथे आता कायम वस्तीसाठी जाणे भाग आहे. बर्फाच्या घरात पुरलेला आणि काळ्याभोर ढगात फसलेला एस्किमो आपणच असतो. पण अशाही वेळी निष्पाप डोळे आणि संसार फुलविणारे हात हातात असतात. काळोखावर मात करण्याची केवढी तरी जिद्द प्रकाश हरवल्यानंतर स्पर्शातून प्राप्त होते. खरे तर असे आहे की, ही कविता जितकी प्रकाश गेल्याची आहे तेवढीच हातात असणाऱ्या आश्वासक हातांची आहे.
डोळे गेल्याची जाणीव या कवीमनात केंद्रीय होऊन बसली आहे. हे डोळेच निळे पक्षी होऊन दूर देशी निघून जातात. या ठिकाणची निळे पंछी ही प्रतिमासुद्धा मोठी अर्थवाहक आहे. पक्षी हे देशांतरासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. ऋतुमानानुसार कित्येकदा हजारो मैलांचे अंतर ओलांडून ते परागंदा होतात. अनपेक्षितपणे ते दूरदेशी जातात आणि जसे जातात तसे अनपेक्षितपणे परतही येतात. परंपरेने हरवलेल्या प्रियकराला पाखरू म्हटले गेले आहे. रावा उडून जातो तसा रुसलेला प्रियकर आठवणी मागे ठेवून दिगंतराला निघून जातो ही ओव्यांमधील लाडकी कल्पना आहे. इथे डोळेच प्रियकरही आहेत, पक्षीही आहेत. मात्र ते पुन्हा कधीही परत-न येण्यासाठी गेलेले आहेत. त्यामुळे लाटांच्या ललाटी काळोख कल्लोळत आहे. माडाच्या मनातील चांदणे मावळलेले आहे. खरे तर असे आहे की डोळे आहेत तिथेच आहेत आणि त्यांची नजर तेवढी संपली आहे. या प्रकाश हरवलेल्या डोळ्यांत फक्त ताटातुटीचा अंधार तेवढा दाटलेला आहे. उत्कट वेदनेला आक्रस्ताळी रूप तर येऊ द्यायचे नाही पण ती वेदनाही मंदाव द्यायची नाही असा तोल सांभाळण्याचा प्रयत्न मोठा कठीण असतो. गोसावीची कविता हा तोल सांभाळण्यात प्राय: यशस्वी होते यातच तिचे सामर्थ्य आहे.
सबंध व्यक्तिमत्त्व तळापासून ढवळून टाकणारी आणि मन उद्ध्वस्त करणारी व्यथा ही मोठी चमत्कारिक बाब आहे. जर या व्यथेने तुमचा संपूर्णपणे ताबा घेतला तर तुम्ही अबोल व स्तब्ध होता. डोळ्यांतील अश्रूच आटून जातात आणि कधी तुम्ही बेभान होऊन आक्रोश करू लागता. हा आक्रोशाचा नाद कलेतील सारे संयमाचे ताण समाप्त करून टाकतो आणि जर या व्यथेवर मात करण्यात तुम्हाला यश आले तर मग तिच्यातील सगळी उत्कटताच समजूतदारपणामुळे