दृष्टी गेली हेच विसरून जाऊन जणू काही घडलेच नाही या पातळीवर स्मृतीतून रंगसंवेदनाचा पिसारा फुलवतील हे कुणालाच सांगता येणार नाही. म्हणून ज्यावेळी मी असाधारण घटना म्हणतो त्यावेळी ती जीवनात घडलेली आहे याला खरा महत्त्वाचा अर्थ आहे. नेमकी गोसावींची कविता काय करते? गमावलेल्या दृष्टीमुळे ती रंगसंवेदनांना पारखी होते काय? की गमावलेल्या वैभवाच्या चिंतनात गढल्यामुळे ती रंगच्छटांच्या बाबत अधिकच दक्ष आणि जागरूक होते? दृक्संवेदना गमावलेल्या मनाला इतर कोणत्या संवेदनेबाबत अधिक जागलेपण आलेले आहे का? की गोसावी आपल्यासमोर पसरलेला काठ व तळ नसलेला निखळ अंधारच ढवळीत बसलेले आहेत? गोसावींच्या कवितेच्या संदर्भात हे प्रश्न आपण विचारू शकतो. त्यांची कवितेने दिलेली उत्तरे तपासू शकतो. सुन्न करणारे, जाळणारे दु:ख माणसाला नुसते विव्हल व आर्तच करीत नसते, ते माणसाला अधिक समंजस व शहाणेही करीत असते. व्यथांचा भोग भोगीतच माणूस म्हणून आपला विकास होत असतो. आपल्या अपंगत्वाच्या जाणिवेने मन पंगूही होते आणि अधिक समर्थही होते. मला माणसाचे काय झाले या लौकिक प्रश्नात रस आहेच. पण कवीचे काय झाले या अलौकिक प्रश्नात अधिक रस आहे.
रस्त्यातून चालताना एकाएकी डोळ्यांसमोर काजव्याच्या ओळी चमकून गेल्या आणि आकाशातील प्रकाश झुंबर कोसळून खाली पडले. त्यानंतर न संपणारा अंधार हाच कायमचा सोबती झाला. ज्याची सोबत नको आहे पण टळणारी नाही त्याच्या सहवासाची सवय होईपावेतो असह्य, प्रदीर्घ यातना चक्रातून जाणे भाग असते. कवी सांगतो, येशूचे दु:खसुद्धा हा खिळाभर यातनेपेक्षा कमीच असेल. यातील खिळाभर कमी असणारे दु:ख ही एक समर्थ प्रतिमा आहे. या प्रतिमेचे सामर्थ्य सत्याच्या अनुबंधात नाही. ते एका कल्पिताच्या अनुबंधात आहे. हा कल्पिताचा अनुबंध नीट समजून घेतला पाहिजे. ख्रिश्चन परंपरेप्रमाणे समजून घ्यायचे तर जगाचे पाप आपल्या माथ्यावर घेऊन प्रभूचा पुत्र मानवजातीच्या कल्याणासाठी स्वत:चे बलिदान करीत होता. कोणतीही धार्मिक भूमिका घेतली नाही तरी आपल्या विचाराशी दृढ राहून हौतात्म्य पत्करणारा येशू हा महात्मा होता, हे कुणीच नाकारणार नाही. पण येथे येशूचे ते दिव्यरूप अभिप्रेत नाही. आपले दारुण दु:ख स्वत:च्या खांद्यावर सूळ वाहून नेताना भोगणारा येशू आणि त्याच्या शरीरात ठोकला जाणारा दैवी आघाताचा यातनामय खिळा इथे अभिप्रेत आहे. येशूच्या दुःखाला निदान अर्थ होता. हे निरर्थक व अकारण दु:ख कवी भोगतो आहे. म्हणून येशूचे दु:ख खिळाभर कमी म्हणायचे.