पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मावळून जाते. आपल्याच मनात जळणारे दु:ख आपणच तटस्थपणे पाहिल्याविना व्यथेची कविता होऊ शकत नाही. गोसावींना सतत जे करावे लागते ते हे. "त्यांना आपलेच दु:ख तटस्थपणे न्याहाळून रसिकांच्या मनापर्यंत नेऊन पोचवावयाचे आहे. हा तळ्यात पसरलेला अंधार आहे आणि या अंधारात पुन: एक नवे तळे निर्माण होत आहे. ज्या तळ्यात अंधार पसरलेला आहे, ते तर कवीमनच आहे. तळ्यात एक निळे कमळ आहे. ते कमळ मेलेले असल्यामुळे आता उमलणार नाही. या कमळात एक भुंगा अडकलेला आहे. त्याचा तडफडाट चालू आहे. हा तडफडाट आणि पिंगा एकच आहे. गोसावीच्या कवितेत दोन रंग फार महत्त्वाचे झालेले दिसतात. दोन्ही रंगांचा संबंध हरवलेल्या दृष्टीशी आहे. एक काळोखाचा काळा रंग आहे. दुसरा निळा रंग आहे.

 अनोळखी ध्रुवावर जिथे बारा महिने रात्र असते तिथे काळ्याभोर ढगात फसलेला गागारीन मी असतो. लाटांच्यावर काळोख कल्लोळत असतो. एका अभागी उंटाच्या पायाखाली न संपणारे काळे वाळवंट असते, काळोखाची नदी दुथडी भरून वहात असते, दाट जमलेला काळोख आणि तो उसवणारी काजव्यांची भीरभीर असते. थबकलेल्या वाटेवर काळोखाचे थवे असतात. नि:शब्द भयाण अंधाराचा काळाकुट्ट पडदा टरकावून देणारा धारदार आवाज म्हणजे एक दीपस्तंभच. पण हा कावळ्याचा कर्कश्श आवाज आहे, असा मधून मधून भेटणारा, सर्वत्र पसरलेला काळा रंग आहे. या काळ्या रंगाइतकेच महत्त्व निळ्या रंगाला आहे. प्रथम म्हणजे डोळे हे निळे पंछी आहेत. पुढे तळ्यातच मेलेले निळे कमळ आहे. पुढे काळ्या शांत डोहात निळ्यास्वप्नछाया आहेत. डोगर निळे-जांभळे आहेत. अंगण निळे आहे. निळसर आभाळाला टेकून निळा-जांभळा डोंगर, त्याच्या पायाशी निळा जलाशय व त्यात निळी कमळे आहेत. कमळातील भुंग्यांचे पंख निळे असल्यामुळे स्वप्नेही निळसर आहेत. असा हा निळसर रंग सर्वत्र पसरला आहे. काळ्या-निळ्या रंगांची ही विचित्र गुंफण मधून मधून जांभळा पदरही दाखवते. रंगाची ही विशिष्ट आवृत्ती या कवितांचे एक अनोखेपण आहे. सामान्यपणे लौकिक जगातील व्यवहारात रंगांना अनेक उदास, हताश अर्थ बिलगलेले असतात. इथे निळ्या-जांभळ्या रंगछटांनी काळोख सतत कवितेच्या पातळीवर झुलता ठेवला आहे आणि त्याचा रंग न बदलता काळोख प्रकाशित केला आहे.

 जेव्हा डोळ्यांतील प्रकाशच गेला तेव्हा आपण पंगू आणि दीन झालो. आता सर्व सुखांची आशाच संपली ही एक तीव्र जाणीव होती. पण माणसाचे

९२ / थेंब अत्तराचे