पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर दुसरीकडे या सगळ्या प्रतिमा मिळून वादीसंवादी तोल राखणाऱ्या एका कलाकृतीची निर्मिती आहे. अभिव्यक्तीची कसरत करीत असतानाच आमराई आणि सावली यांना कवीने स्त्रिया करून टाकून त्या न्हाण्याकडे पाहण्याचा दष्टिकोनच पार बदलून टाकला आहे. मी म्हणतो, त्यांच्या वैभवाचा दिमाख दाखविण्यासाठी अशा कविता जोपर्यंत आहेत, तोपर्यंत या संग्रहातील साधारण कवितांची संख्या अगदी थोडी आहे, अशा जुजबी आणि लंगड्या समर्थनाची काय गरज?

 एकदा हाताळलेला विषय बी. रघुनाथ पुनः पन्हा हाताळतात याबद्दल कधी कधी आक्षेपवजा सूर निघत असतो. काही विषयांची कवीला खास गोडी आहे. अशा शब्दांत, तर कधी तेच तेच विषय त्यांच्या काव्यांत सापडतात, अशा शब्दांत हा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. एकाच विषयावर त्याच्या कविता आढळतात ही गोष्ट खरी आहे, पण दर कवितेत तो विषय हाताळण्याची त्यांची पातळी आणि हाताळीत असताना त्यांनी साधलेली भावसघनतेची रीत निरनिराळी आहे, हे मात्र सोयीस्करपणे विसरले जाते. 'गांव गंगा', 'कशाला मुखी पुन्हा तांबुल' आणि 'नगर भवानी' या एकाच विषयावरील त्यांच्या तीन कविता आहेत. ही गांव गंगा अनेक संसारांना तडे मारीत गावांतन भटकत असते, पण स्वत: मात्र सुधीच राहते याची निष्कारण खंत पहिल्या कवितेत कवीला वाटत असते. एकेरी असणाऱ्या या कवितेत कवीने आपला संताप मर्यादितच का होईना पण व्यक्त केलेला आहे. वस्तुत: वेश्या म्हटल्यानंतर शरीराचा व्यापार आणि गिऱ्हाइके गाठणे ही इतकी सरळ गोष्ट आहे की, त्यापेक्षा वेगळी अपेक्षा अशा स्त्रियांकडून ठेवणे हाच भोळेपणा ठरावा. हा सामाजिक कच्चेपणा उरलेल्या दोन कवितांतून आढळत नाही. जगातील वेश्या व्यवसायाला केवळ एका स्त्री-व्यक्तीस जबाबदार धरता येणार नाही हे आता कवीला समजून चुकले. ज्या संमिश्र जगात आपण रमतो तेथे हे चालायचेच, याचा उमज त्याला पडतो. दुसऱ्या कवितेत कवीने एक साधारण महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. वारयोषितांना विजयाची हमी आहे, हावभाव, शरीरादी सारी हत्यारे जय्यत तयार आहेत, त्याचा उपयोगही होत आहे. तिथे पुन्हा मुखी तांबुल असण्याची गरज कुठे आहे? जिथे साराच व्यवहार देवाणघेवाणीच्या भक्ष्य-भक्षकाच्या पातळीवरचा उघड आणि मान्य आहे, तिथे नर्मशृंगार, तृप्ती इत्यादींची सूचना देणारे तांबूल कशाला असा त्यांचा प्रश्न आहे. हा प्रश्न भेदक तर खराच पण ती कविता शृंगारिक समजली गेल्यामुळे दुर्लक्षिल्या

पुन्हा नभाच्या लाल कडा । ७