कवितेत पायरीपायरीने होत होता आणि शीग गाठण्याच्या आत त्यांची चढण निसर्गाने संपविली आहे. वृत्तबद्ध गद्य इतकीच ज्या कवितांची किंमत करता येईल अशा कवितांपासून त्यांनी आरंभ केला आहे. पारंपरिक विषयांचा पारंपरिक उपन्यास करीत कुठे कुठे कवितांचे तात्पर्यही वेगळे काढून ठेवले आहे. सपाटीवरील अनुभवाची स्थूल अभिव्यक्ती करण्यात खर्ची पडलेल्या त्यांच्या कवितांची संख्या अगदीच कमी नाही, पण कवीचे मोल त्याच्या कमाल उंचीवरून ठरविले जाते. काव्यवास्तूचा कळस गगनचुंबी नसेल तर चौथऱ्याची सुबकता आणि भव्यता दोन्हीही व्यर्थ होतात.
बी. रघुनाथ यांच्या प्रतिभेतील सामर्थ्यांची प्रचिती 'उन्हांत बसली न्हात', 'चंदनाच्या विठोबाची माय गांवा गेली' यांसारख्या कवितांतून येते. उत्कट व्यथा संयमाने आणि सूचकतेने व्यक्त करताना नाजूक भावनांची तितकीच सूचक अभिव्यक्ती करणे आणि ही वेदना मधुर करणे, हे सामर्थ्य 'चंदनाच्या विठोबाची-' सारख्या कवितांतून प्रकर्षाने आढळून येते. चंदनाच्या विठोबाची माय गांवाला जाताना ओसरीची पंढरीच नव्हे तर कवीचा संसारही ओस करून गेली आहे; आणि नुसते तिचे घरकुलच कोनाड्यांत उमडून पडलेले नसून कवीचे अंत:करणही विस्कळित होऊन गेले आहे याची साक्ष त्या कवितेत पटते. पण हा विस्कळितपणाच सुरळीतपणापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. कारण त्याची कविमनाला झालेली बोच त्याच्या हतभागी जीवनातील एक रम्य विश्रांती स्थान दाखविणारी आहे. जे भरले त्या रांजणांत आजवर सापडलेले नव्हते, ते अशा वेळी रित्या बोळक्यांत भरून ठेवलेले आढळून येते. पाचसात तोटक्या ओळींनी विणलेले हे काव्यवस्त्र व्यंजनेच्या पदरांनी किती तरी विस्तृत आणि भरदार झाले आहे.
त्यांच्या सामर्थ्याचा अजून एक पैलू 'उन्हांत बसली न्हात' या कवितेत आहे. उन्हात न्हात बसलेल्या नग्न यौवनेच्या या चित्रांत अभिलाषा नावालासुद्धा नसावी हेच आधी फार महत्त्वाचे आहे. पार्थिव सौंदर्यांचे हे भावमय टिपण एक क्षण शब्दांत टिपताना एक दृक्पात पार्श्वभूमीवर, तर एक या पार्श्वभूमीवर उठून दिसणाऱ्या न्हात्या चित्रावर असे मंथर गतीत थरथरणारे आहे. ज्याचे वर्णन कवीने एकांत म्हणून केले आहे, तो वास्तविक उघडा आडोसा आहे. भुलून थबकणारी सावली, डोकावून पाहणारी आमराई, मंगल न्हाणे गाणारे कोंगे, यांनी हा एकांताचा भंग न करता कौतुकांनी आणि स्वागतांनी गजबजून सोडला आहे. अनुभवाची प्रत्येक सार्थ छटा एकीकडे स्वयंपूर्ण प्रतिमा आहे.