पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेल्या आहेत. तिसऱ्या कवितेत तर कवी याहीपेक्षा निश्चित भूमिकेवर येऊन ठेपला आहे. नगरभवानीचे आगमन होत असल्याचे दुरून दिसताच आता सडकेवर दुतर्फा काय घडणार आहे याची निश्चित माहिती त्याला आधीच आहे. नगरभवानीच्या दिशेकडे पाठ फिरवून सभोवताल तिच्या आगमनाचा होणारा परिणाम कवी न्याहळीत आहे आणि आपले तिखट शेरे देत आहे. नगरभवानी आणि समाज, नगरभवानी आणि कवी, कवी आणि समाज या तिहेरी गुंफणीने कवीने आपला संमिश्र अनुभव संमिश्रच ठेवून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही गुंफण करतानाच, 'अभिलाषेवर कितीक आले प्रयागकाशी करूनि' अशा प्रतिमा वापरून एक निराळी भावनानिष्ठ समानता साधली आहे.

 बी. रघुनाथ यांचे समग्र काव्य आता एकत्र डोळ्यांसमोर आले असताना त्यांच्या वरील काही मतांना मुरड घालणे आवश्यक झाले आहे. हा कवी केवळ शृंगारिक कविता लिहिणारा नसून सामाजिक आणि राजकीय आकांक्षांनीही त्यांच्या कवि-मानसाला स्पर्श केला आहे हे समजून घेतले पाहिजे. 'पश्चिमे तुझें नभ काजळलें', 'अरे त्या आंधळीला कुणी सांगा', 'रे ओल्या काष्ठा पेट' इत्यादी कवितांतून सामाजिक परिस्थितीचे पडसाद दिसून येतात. अर्थातच जो धगधगीतपणा कांत, कुसुमाग्रजांत आढळतो, तो इथे नाही हे खरे आहे. पण कांतांना कधीही घेता आले नाही, इतके समरसून शिशुजीवनाचे दर्शन (दोनच कवितांत का होईना) बी. रघुनाथ यांनी घेतले आहे.

 सतत पंचवीस वर्षे अभिव्यक्तीच्या पूर्णतेसाठी धडपड करीत असताना माध्यमावर त्यांनी अनेक संस्कार केले आहेत. लावणी वाङ्मयांतून ‘सजणा', 'चवणा' सारखे शब्द एकीकडे उचलले आहेत. तर बोरकर, पाडगांवकरांकडून हुळहुळे, सळसळे, झळझळेसारखे नादमधुर शब्दही वेचले आहेत. इतरांच्यात त्यांना जे. आकर्षक वाटले, ते त्यांनी उचलले आहे. पण पचवल्याखेरीज वापरले मात्र नाही. आपल्या व्यक्तित्वाची डूब देताना काही चिरपरिचित शब्द निराळ्याच अर्थाने त्यांनी वापरले आहेत. 'सजण माडिचा चढे जिना' या कवितेतील 'सजण' शब्द अशीच दिशाभूल करणारा ठरला आहे. डॉ. ना. ग. जोशी यांनी शृंगाराच्या संदर्भात ही ओळ उल्लेखिली आहे, पण कवितेत मात्र शृंगारापेक्षा करुण रसाच्या छटाच जास्त आहेत. काही अर्थपूर्ण विशेष एकत्र करून त्याद्वारे प्रतिमा साकार करताना त्यांनी काही नवे संकेतही निर्माण केले आहेत. 'संगीत इंगित', 'काजळ कांठ', 'तहान आग दवांनी ही त्यांची काही

८ । थेंब अत्तराचे