गुंडाळून फेकून देतो. आपला व्यवहार संस्कृतीचे नाव सांगणाऱ्या असंस्कृत माणसांचा व्यवहार असतो. यातून निर्माण होण्याऱ्या प्रश्नांची जबाबदारी संस्कृतीवर टाकली तर त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, संस्कृती आणि परंपरा यांनी प्रगतीला अडसर घातलेला आहेच. हा अडसर मोडायला हवाच पण त्या अडसराचे स्वरूप भोगवाद हे नाही.
माणसाच्या समूहाकडे जंगल म्हणून पाहणे सुरू झाले की, झाडांच्याकडे माणसे म्हणून पाहणे सुरू होणारच. त्या दृष्टीने या संग्रहातील झाडांच्या कविता, हा कविता गुच्छ पाहण्याजोगा आहे. पाने झडलेली, बहर ओसरलेली, फक्त सांगाडे म्हणून उरलेली हजारो झाडे, आपल्या मुळांना सुद्धा सावली देणे ज्यांना जमू शकत नाही आणि मुळेही ज्यांची खुरटलेली आहेत अशी झाडे. इतरांच्या शोषणावर जगणारी झाडे. ज्या मळावर जगायचे त्याचे अस्तित्व या बांडगुळांना नाकारणेच भाग असते. बांडगूळ जर मूळ झाडाची चिंता करू लागले तर स्वत:च मरून जाईल. ही झाडे झाडे नाहीतच. या माणसांच्या जंगलात ही झाडे माणूस म्हणूनच वावरणार. प्रत्येक कविता निराळी असते. हे जितके खरे आहे तितकेच हे ही खरे आहे की, सर्व कवितांच्या मागे असणारे जे कवी मन, त्याची एक संगती असते व ती सर्व कवितांच्या मधून पसरलेली असते.
अशा या अस्वस्थ उद्विग्न मनाचे स्वरूप ग्रासलेल्या सूर्यासारखे आहे असे कवीला वाटते. खरोखरचे आजच्या तरुणांचे मन ग्रासलेल्या सूर्यासारखे आहे का? या मुद्द्यावर प्रत्येकाचे म्हणणे निराळे असणार पण कवीला आपण ग्रासलेले सूर्य आहो असे वाटण्याचा हक्क आहे. नारायण सुर्वे आपल्या कवितेतून सतत सूर्यफुलाचा उल्लेख करीत असतात. त्यांच्या डोळ्यांसमोर क्रांती आहे. पण ती क्रांती शास्त्रीय समाजवाद मान्य करणारी क्रांती आहे. अस्वस्थपणा आणि त्यामुळे निर्माण होणारी विद्रोही जाणीव या खेरीज कोणत्या एका निश्चित तत्त्वज्ञानाला या कवितेने अजून स्वत:ला बांधून घेतलेले नाही. समाजाची बांधिलकी मान्य करणारी पण कोणत्याही एका भूमिकेची बांधिलकी मान्य न करणारी अशी ही कविता आज तरी आपल्या व्यथा व उद्वेगाशी, जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करीत आहे. कदाचित हेच तिचे सामर्थ्य असेल.
लोकशाही या समाजाचे प्रश्न सोडवू शकेल का? लोकशाहीच्या झाडावर कावळे बसलेले आहेत आणि सरडे सतत रंग बदलत आहेत. या संसदभवनाला