दृष्टिकोण आहे. माणसे जंगलाचा जास्त विचार करतात त्याचे हे चित्र आहे. हेच जंगल माणसांना मानवी जीवनात दिसते. जंगलातील प्राणी बोलू लागले तर कदाचित हे मानवी जंगल आपल्या जंगलासारखे आहे, हे मान्य करणार नाहीत.
शहर नावाच्या मानवी जंगलात जनावरे आपलीच जात गुलाम करतात, आपल्याच जातीचा सौदा करतात. जनावराच्या जंगलात वासनाजयाचा दंभ नाही आणि वासनेचा उघडा नागडा बाजार व तिचे प्रदर्शनही नाही. जनावराना माणसाच्या इतकी बुद्धी नाही म्हणून त्या जंगलाला काही तरी स्वाभाविक नियम आहेत. तेही या जंगलात नाहीत. घुबड हा प्राणी आपल्याकडे अशुभ मानलेला आहे. पण पाश्चात्त्य परंपरेत हा प्राणी ज्ञानी म्हणून प्रसिद्ध आहे. कुंपणावर बसलेले हे सारे ज्ञानी सुद्धा हे जंगल आहे यापेक्षा अधिक काही सांगणार नाहीत.
प्रा. शरद देशमुख यांची सामाजिक जाणीव तीव्र असणारी कविता ज्या वळणा-वाकणातून प्रवास करीत आहे त्याचे हे स्थूल चित्र आहे. या वातावरणात स्वत: कवी उभा आहे. त्याच्या मते आपण फक्त हँगर आहो. कुठे तरी, केव्हा तरी आपण अधरच अडकून पडलेले आहो. मनाचे दुभंगलेपण आपल्या जवळ आहे. ते संपायला हवे. मन सलग एकसंध व्हायला हवे. संस्कृतीच्या डबक्यातून बाहेर पडायचे आहे. आता खरडणे व रखडणे बंद करायचे आहे. हे सगळे विचार करीत चालू असेल तर फक्त लटकणे चालू आहे. या कवितेतील संस्कृतीचे डबके ही कल्पना मला थोडी स्पष्ट करावीशी वाटते. संस्कृतीच्या डबक्यातले आपण बेडूक आहोत असे वाटणे ठीक आहे. पण या वाटण्याला सत्याचा आधार आहे का हे मात्र मला विवाद्य वाटते.
कोणत्याही संस्कृतीने व्यसनीपणाचा पुरस्कार केलेला नाही. वाढती व्यसनाधीनता हे ज्या समूहाचे लक्षण त्यांना संस्कृतीच्या डबक्यातले बेड़क म्हणायचे का? अनीतीचा पुरस्कार कोणत्याही संस्कृतीने केलेला नाही. वाढता उघडा नागडा भोगवाद हा संस्कृतीचा परिणाम मानायचा का? संस्कृती आणि परंपरावाद यामुळे मला फार मोठ्या मर्यादा पडतात हे खरे आहे. पण ज्या मर्यादा परंपरावादामुळे पडतात त्याचे स्वरूप भोगवाद व व्यसने यांची वाढ हे नाही. सत्य असे आहे की संस्कृतीच्या कल्पना आपण सोयीने वापरतो. कधी त्यांचे अर्थ आपल्या सोयीचे करून घेतो. कधी आपल्या स्वार्थावर पांघरूण म्हणून संस्कृती वापरतो आणि कधी व्यवहार असे नाव सांगून चक्क संस्कृती