महारोग झालेला आहे अशी तक्रार हे कवीमन सतत करीत आहे. कवी म्हणतो, जीवनावर माझी श्रद्धा आहे पण मृत्यूवर माझे प्रेम आहे. माझे म्हणणे इतकेच आहे की क्षोभ संपला म्हणजे हा विचार करून पाहिला पाहिजे. सर्वांना मतदानाचा अधिकार आहे तरी समाज पिळून त्याचे शोषण करणारे सत्तेत येतच राहतात. जेव्हा लोकांना काही अधिकारच असणार नाहीत तेव्हा सत्तेत कोण असतील याची हमी कोण देणार?
या कविता संग्रहाच्या निमित्ताने मला जे जाणवले त्याची ही थोडक्यात नोंद आहे. सामाजिक जाणीव तीव्र असणाऱ्या कवीच्या कवितेविषयी प्रतिक्रिया नोंदविताना आपल्याही सामाजिक प्रतिक्रियाच बलवान होणार याला इलाज नसतो. मी जे लिहितो आहे ते या कवितेचे वाङ्मयीन रसग्रहण नव्हे हे मलाही कळते. पण वाचकांच्या समोर ही कविता जाताना जे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण व्हावे असे मला वाटले त्याची नोंद करणे भाग होते. प्रस्तावनाकाराने मुख्य म्हणजे पाठराखणी करायची गरज आहे असे मला वाटत नाही. पण माया वेडी असते. आपल्या विद्यार्थ्याच्या संग्रहास आपण चार शब्द जोडावेत अशी ओढ अनावर असते म्हणून हा प्रपंच.
शरद देशमुखांच्या क्षमतेचा उत्तरोत्तर विकास झालेला आम्ही दर क्षणी पाहत राहू. हे पाहण्यात जो आनंद आहे तो कळण्यासाठी ज्याची पुष्कळ निंदा या कवितेत आहे तो मास्तर तुम्ही असणे आवश्यक असते. माझ्यात तो मास्तरपणा आहे असे मी मानतो.