एक नोंद आहे. या सगळ्या नोंदी जरी कवीच्या मनात टिपलेल्या असल्या तरी तो कोणत्याही जातीधर्माचा शत्रू नाही, द्वेष्टा झालेला नाही. तो मुस्लिम परंपरावादाचा विरोधक आहे पण मुस्लिम समाजाचा शत्रू नाही किंवा मुस्लिम संस्कृतीचाही टेगा नाही. हिंदू परंपरावादाचा तो विरोधक आहे पण हिदू समाजाचा अगर धर्माचा तो द्वेष्टा नाही. कधी कधी तर मला असे वाटते की, माणसे अंध कर्मठपणा मनात ठेवूनच कशाचे तरी द्वेष्टे होतात. कर्मठपणाच्या बंधनातून ज्याचे मन मोकळे झालेले आहे ती माणसे द्वेष्टी होऊ शकत नाहीत. त्यांना एकाच वेळी सर्व 'हास्यास्पद' सहानुभूतीने समजून घ्यावे लागते. आणि सर्व सहानुभूता 'हास्यास्पदांना' सुधारुन घेण्यासाठी वापरावी लागते. हे सगळे दायित्व आपण सर्वत्र परके आहोत याचे भान ठेवून स्वीकारावे लागते. शहाजिंदेच्या कवितेतील तटस्थपणा आणि उत्कटता या दोहोचे अनुबंध या संदर्भात तपासावे लागतात.
शहाजिंदेच्या कवितेकडे जाण्यापूर्वी त्याच्या मनाची काहीशी ओळख करून देण्याचा हा उद्योग सहेतुक आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रात आपण पृथगात्मतेला महत्त्व देतो. हे अनुभवाचे निराळेपण एकूण वाङ्मयाच्या समृद्धीत भर घालणारे असते. हे निराळेपण केवळ व्यक्तीच्या निराळेपणामुळे येत नाही. त्या व्यक्तीच्या मागे जे नानाविध संदर्भ उभे असतात त्या संदर्भाचाही या निराळेपणात वाटा असतो. दलित साहित्याचे निराळेपण हे केवळ लेखकांच्यावर अवलंबून नाही. लेखकाइतकाच सामाजिक संदर्भ महत्त्वाचा आहे. ललित वाङ्मयातील भावनाविश्व नुसत्या घटनांनी बनत नाही; घटनांच्या मागेपुढे भावनांचे कल्लोळ असतात. आणि भावनांच्या कल्लोळांच्या पार्श्वभूमीत सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ उभे असतात, त्यांनी बनते.
शहाजिंदे यांची कविता ही जवळ जवळ गद्य असल्यासारखी आहे. हे गद्य नुसते गद्य नाही. तर दैनंदिन भाषेत सतत वापरले जाणारे गद्य आहे. अशी गद्य वाक्येच एकमेकांच्या विरोधात उभी करून शहाजिंदे आपल्या कवितेला आकार देत असतात. त्यामुळे या कवितेची वरवर पाहणी करणाऱ्यांना चटकन नीट ओळख पटणे कठीण आहे. या गद्य तुकड्यातच नकळत प्रतिमा येऊन जातात, सूचना असतात, जुनी नवी प्रतीकेसुद्धा असतात. वर्तमानकाळातील स्थळकाळाच्या नोंदी यांच्या शेजारी हिंदू आणि मुसलमानांच्या धर्म, इतिहास आणि संस्कृतीचे संदर्भही असतात. यातील इस्लामी संस्कृतीचे संदर्भ नेहमीच मराठी वाचकांना चटकन कळतील असे नाही. मधेच 'इशाँची नमाज' असा उल्लेख असतो. 'खुदबा' हा शुद्ध मराठी आणि इस्लामी दोन्ही अर्थानी शेजारी