पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवणेही तिला आवडणार नाही. संध्याकाळ आणि उंबरठा या दोहोंच्या संपर्कात असणारी आई अभिमानाने स्मरण ठेवीत आहे एका जुन्या स्मृतीचे. कान्होपात्रा ही शेवटी गणिका होती. आपण गणिका कुळातील आहोत हा काही मोठा अभिमानाचा भाग नाही पण ती गणिका संत होती हा अभिमानाचा भाग आहे. आयुष्याची साठ वर्षे संपली तरी अंधश्रद्धा शाबूत ठेवणारी आई आणि मी नक्की कोण याचे उत्तर न सापडल्यामुळे, ते शुष्क हाडूक चघळीत आयुष्याची सव्वीस पाने कोरी झालेला हा कवी. या दोन बाबी आणि त्यातला विसंवाद शहाजिंदे डोळ्यांसमोर ठेवतो कारण या सर्वांगीण विसंवादातच त्याच्या व्यथेचा उगम आहे.

 रमजान हा मुसलमानांचा पवित्र सण. या रमजानचा शेवट 'खुदबा' या सणावर होतो. लहानपणी या कवीनेही श्रद्धेने रमजानचे उपवास केलेले असतात. आता ती श्रद्धा संपलेली आहे. आता रमजानचे रोजे प्रेमभंगानंतर प्रेयसी आठवावी तसे आठवतात. पण श्रद्धा जरी नसली तरी रूढी म्हणून खुदबा करावाच लागतो. नावडती कविता नाईलाजाने शिकवावी लागते, त्याप्रमाणे नाईलाज म्हणून का होईना पण विधी पार पाडावेच लागतात. मुसलमान कितीही सद्गुणी असला तरी हिंदूचा त्यावर विश्वास नसतो. हिंदूंनी कितीही संरक्षण दिले तरी मुसलमानांना असुरक्षितच वाटते. हे पाहता पाहता शहाजिंदे इतरांनी आपल्या विषयी केलेल्या नोंदी लक्षात घेतो. कारण या आपल्या विषयी इतरांनी केलेल्या नोंदी आपल्या आत्मचरित्राचा भाग आहेत असे त्याला वाटते. कारण जसा मी, मला तसाच तो मी आहे असा या कवीचा आग्रह नाही. ज्या इतरांना मी दिसतो तसाही मी आहे असेच त्यालाही वाटते. स्वत:विषयी परस्पर विरोधी अभिप्राय हा कवी नोंदवीत जातो. शहाजिंदेची तटस्थता हीच एक अभ्यास विषय व्हावा अशी गुंतागुंतीची बाब आहे. भोवतालच्या समाजातील सर्व अंधश्रद्धा तो तटस्थपणे टिपीत राहातो. 'स्वत:च्या जीवनाविषयी तो तितक्याच तटस्थपणे प्रतिक्रिया नोंदवितो. इतरांच्या आपल्या विषयीच्या प्रतिक्रिया-सुद्धा त्याने तटस्थपणे नोंदविलेल्या असतात आणि हा सगळा तटस्थपणा त्याच्या कवितेत सर्व बाजूंनी जरी आला तरी त्यामुळे या कवितेतील उत्कट व्यथा आणि उद्वेग यांची धार मात्र बोथट होत नाही. अतिशय थंडपणे अस्वस्थ करणाऱ्या प्रतिक्रिया परस्पर विरोधाची लय साधीत तो शांतपणे नोंदवीत राहतो. स्वत:विषयी इतरांच्या ज्या प्रतिक्रिया त्याने नोंदविलेल्या आहेत त्यांपैकी 'अहो त्या मुसलमानाशी कशाला दोस्ती करता' या कुणीतरी काढलेल्या उद्गाराची नोंद आहे. 'सगळे मुसलमान असेच रागीट, आक्रमक आणि हट्टी' अशी एक नोंद आहे. 'स्वत:च्याच विषयी इतरांनी केलेले कटपीस' असे वर्णनही

६६ / थेंब अत्तराचे