शेजारी वापरलेला असतो. परमेश्वराच्या नावाने प्रार्थना हा तर खुदबाचा अर्थ आहेच पण बोलभाषेत खुदबा म्हणजे मारून टाकणे, नष्ट करणे असाही अर्थ आहे. किंग लिअर नाटकातील अति प्रेमळपणाचा आव आणणाऱ्या हरामजाद्या पोरी, मुस्लिम औरंगजेब, महाभारतातील भीष्म आणि आजच्या चित्रपट जगातील किशोरकुमार हे सगळे एकाच कवितेत शेजारी शेजारी वावरत असतात. महाभारतातील शकुनी आणि कर्ण आजच्या दुकानदाराभोवताली असतात. त्यानंतर लगेच मोहरमच्या दुःखाचा उल्लेख असतो. या कवितेतील गद्यप्रायता, बोलभाषेतील वाक्ये ही एक चकवा निर्माण करणारी सामग्री आहे. ही सामग्री घेऊन हा कवी काही तरी विलक्षण सांगण्याचा प्रयत्न करतो हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे. शब्दाच्यामध्ये असणारी सूचकता आणि शब्दाच्यामध्ये असणारी आघात करणारी ढोबळ परिणामकारकता या दोहोंचाही एकाच वेळी वापर करण्याची या कवीची पद्धत आहे. म्हणून ही कविता वाचताना सतत हेलकावे बसत असतात. या हेलकाव्यांनीच या कवितेत भावनिक ताण निर्माण केलेला आहे. शहाजिंदेची कविता फार अवघड आणि दुर्बोध नाही हे जितके खरे आहे तितकेच चटकन ती चिमटीत सापडणारी नाही हेही खरे आहे.
मध्येच हा कवी विचारणार, जेव्हा मातीची खेळणी मातीशीच बेईमान होतात, तेव्हा काय होते? तो आपणच उत्तर देतो की जेव्हा असे होते त्यावेळेला अनेक बाबीवर बंदी असूनही बंदी नसते आणि अशा वेळी प्रजासत्ताक झोपत झोपत चालत असते. झोपत झोपत चालणे रंगीबेरंगी जातीधर्म आणि धडधाकटांनी पांगळ्याची गाणी म्हणणे असे झोके देत देत हा कवी कविता लिहितो. धर्मद्रोह्यांनी मातीद्रोह न करता वागायचे असे ठरविले म्हणजे मग निवडणुका घ्यायला हरकत नाही असे तो सांगतो. म्हणजे एकावेळी तो 'माती' या शब्दाचे अनेक संदर्भ जागे करणार त्याचवेळी काही विरोधलयीचे प्रकार साधणार आणि हे करतानाच मिस्किलपणे एखादे राजकीय भाष्य असे करणार की, त्या भाष्यामुळे मन विषण्ण होऊन जावे. शहाजिंदे यांची कविता सतत वळणे, वाकणे घेत जाणारी असल्यामुळे तिचा अनलंकृत साधेपणा सुद्धा काळजीपूर्वक समजून घेण्याची गरज आहे. नाही तर त्यांनीच म्हटल्याप्रमाणे एखादवेळी तुमच्या माझ्या आयुष्याची घसरगुंडी होते आणि अर्थ म्हणजेही एक घसरगुंडीच ठरते. नेमका पगार घेऊन आयुष्य चिवडल्यासारखे शब्दांचे अर्थ चिवडता येतील काय? की शब्दाचे अर्थ चिवडीत असताना चिमटीत फक्त घसरगुंडीच येईल? हा प्रश्न स्वत:ला विचारीत ही कविता वाचावी लागते.