असतात, ती विनोदही उथळच करतात. त्यात फारसा मार्मिकपणा नसतो. पण सर्वचजण असे नसतात. जीवनातील सर्व भव्य, उदात्त आणि गंभीर यांची अचूक जाण असणे चांगल्या विनोदकाराला आवश्यक असते. मराठीत तरी विनोदाची परंपरा ही अशी आहे. कोल्हटकर अतिशय गाढे विद्वान होते. आणि आचार्य अत्रे प्रबल सामाजिक श्रद्धा असणारे सार्वजनिक जीवनातील लढवय्ये होते. आज तोच वारसा पु. ल. देशपांडे चालवीत आहेत.
पूर्वी पाश्चिमात्य जगातही विनोदाला मानाचे असे स्थान नव्हते. करमणूक करणारे भाडोत्री लोक राजे व सरदार बाळगीत. या जीवनातील पात्रांची रूपे वाङ्मयात फूल, बफून, क्लाऊन, जेस्टर इत्यादी रूपाने येतात. या भाडोत्री मंडळींना जीवनात प्रतिष्ठा असण्याचे कोणतेही कारण नव्हते. समाजातील वरिष्ठ वर्ग रिकामा असेल त्यावेळी या विदूषकांना बोलावून आपली करमणूक करून घेई. पण फ्रेंच राज्यक्रांतीपासून हे चित्र बदलले. ज्या लेखकांनी फ्रेंच राज्यक्रांतीची पूर्वतयारी केली त्यात व्हॉल्टेअरसारखे लोक होते. परंपरागत समाजरचना, राजेशाही आणि धर्मगुरू यांच्याविरुद्ध आणि बुद्धिप्रामाण्यवाद, लोकशाही स्वातंत्र्य, या बाजूने हा विनोद उभा होता. व्हॉल्टेअरसारखे लेखक क्रांतिकारकांचे आदरणीय नेते होते. तेव्हापासून सार्वजनिक जीवनात विनोदाची प्रतिष्ठा क्रमाने वाढताना आढळते. अमेरिकेत अब्राहाम लिंकन, इंग्लंडमध्ये डिझरायली व चर्चिल हे कोट्या व विनोदासाठी प्रसिद्ध असणारे नेते होत. आपल्याकडे म. गांधींनी सार्वजनिक व राजकीय जीवनात विनोदाला प्रतिष्ठा दिली.
ज्या प्रमाणात विनोदाची प्रतिष्ठा वाढू लागली त्या प्रमाणात विनोदाचे रूपही पालटू लागले. पूर्वी विनोद ठोकळेबाज स्थूल होता. त्यात मूर्खपणा आणि अश्लीलता याचे प्रमाणही खूप मोठे होते व या विनोदामागे कोणतीही गंभीर पार्श्वभूमी नसे. हा विनोद क्रमाने बदलत गेला आहे. एकतर विनोद बौद्धिक चमकदारपणाचा पुरावा ठरू लागल्यामुळे त्यातील मार्मिकता व सूक्ष्मता वाढत गेली आहे. दुसरे म्हणजे विनोदाच्या मागे विचारपूर्वक ठरवलेल्या गंभीर भूमिका दिसू लागल्या आहेत आणि विनोद विध्वंसक तर कधी सुधारक टीकेचे रूप घेऊ लागला आहे. संयम, तोल आणि मार्मिकपणा याला विनोदात महत्त्व येऊ लागले आहे. केवळ हसविणे या पलीकडे जाऊन विनोद कलात्मक आणि वाङ्मयीन असे रूप घेऊ लागला आहे. आचार्य अत्रे यांचे महत्त्व विडंबनपर कविता लिहिण्यात नसून विडंबनाला कलात्मक दर्जावर यशस्वीपणे पोचविण्यात आहे.