Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रसिद्ध उदाहरण आहे. पावसाळा आला आणि बेडूक एका सुरात ओरडू लागले. तो कोलाहल आणि त्यातील स्वरांचा चढ-उतार पाहून एका ऋषीला वेदपठण करणाऱ्या ब्राह्मणांची आठवण झाली. आणि तो या बेडकांच्या ओरडण्याची स्तुती करू लागला. असा या सक्ताचा विषय आहे. याच प्रकारचे २ एक सूक्त ग्रावनसूक्त आहे. ग्रावन म्हणजे वरवंटा. पाट्यावर वरवंटा फिरत असतो व तो सोमवल्ली वाटीत असतो. हा वरवंटा भाग्यवान प्रियकर असून दहा अंगली या त्याच्या प्रेयसी त्याला घट्ट लपेटून आहेत. त्या ग्रावनाची स्तुती करणारे हे सूक्त असेच खेळकरपणाचे आहे. तेव्हापासून म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून मिस्किलपणा वाङ्‌मयात डोकावतो आहेच. संस्कृत नाटकांच्या मधून विटविदूषकांच्या रूपानं तर विनोद आहेच पण त्याखेरीज विनोदी स्फुट श्लोक आहेत. मराठी संत वाङ्‌मयात एकनाथ आणि तुकाराम यांनीही उपहास, उपरोधाचा वापर भक्तीच्या प्रचारार्थ खूप केला आहे. पंढरपूरला वारीसाठी म्हणून जाणारी आणि वेशीपासून परत येणारी आवा तुकारामाने अचूकपणे टिपली आहे. आधुनिक मराठी वाङ्‌मयात विडंबन काव्याचे जनकत्व आचार्य अत्रे यांच्याकडे देण्याची प्रथा आहे. पण त्यांच्याही पूर्वी इ.स. १८८९ साली म. रा. तेलंग यांचे 'संगीत हजामत' हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. त्यात त्यावेळच्या लोकप्रिय नाट्यगीतांची विडंबने आहेत. गडकऱ्यांच्या कवितांमध्ये 'हुकमेहुकुम' सारख्या विनोदी कविता आहेत. कोल्हटकरांच्याही 'आई थोर तझे उपकार' सारख्या कविता आहेत. सांगण्याचा उद्देश हा की हास्य ही मानवी मनाची सततची प्रवृत्ती आहे ती वाङ्‌मयात मधून मधून प्रकट होत आलेली आहे. विनोदाचा वापर असा सततचा असतो पण म्हणून त्याला प्रतिष्ठा मिळेल असे नाही.

 आपण काहीही कारण नसताना मानवी मन एकेरी, 'एक सुरी' असे गृहीत धरतो. हास्य निर्माण करणारे, विनोदी बोलणारे, करमणूक करणारे जीवनातील गांभीर्याचे स्थान नीटपणे ओळखीत नाहीत असे आपल्याला वाटते आणि जीवनाचा गंभीरपणे विचार करणारे लोक कधी खेळकर होतच नाहीत, कधी हसतच नाहीत असेही आपल्याला वाटते. जो ध्येयवादी, बलिदान करणारा, आत्मसमर्पण करणारा देशभक्त आहे. तो मिस्किलपणे थट्टा करणारा माणूसही असू शकतो हे आपल्याला लौकर पटत नाही, काही जणांच्या जीवनविषयक धोरणाच उथळ असतात. खा, प्या, हसा, मजा करा आणि जगा या पलीकडे कोणतीही गंभीर गोष्ट त्यांना नकोच असते. अशी उथळ माणसे उथळच

चौथे अपत्य / ४९