Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शरद कट्टी यांच्या कविता परिहासासाठी आहेत. एखादे निश्चित सामाजिक, राजकीय सत्र त्यांच्यासमोर आहे असे नाही. थोडावेळ हसणे, हसवण इतकच त्यांना अभिप्रेत आहे. त्यात जर टीका आली तर ती अनुषांगक आहे. हा परिहास करताना चमकदार कल्पना व शाब्दिक कोट्या यांचे साह्य फार मोठे असते. सांपत्तिक परिस्थिती सुधारण्याची साधने कट्टींनी दोन सांगितलेली आहेत. एकतर कुलूप आणि दुसरे म्हणजे लूप. आता या ठिकाणी कुलूप आणि लूप यांचे उच्चार- साधर्म्य हा तर हास्याचा एक भाग आहेच. पण त्यामागे नानाविध सहचारी जाणिवांचे साधर्म्यसुद्धा आहे. लूप हे शासनाने मोठ्या प्रमाणात पुरस्कारलेले कुटुंब नियोजनाचे साधन आहे. सतत मुले होत राहणे हा कारखाना चालू असण्याचा भाग. ही प्रक्रिया बंद पाडण हे लूपच कार्य. म्हटले तर लूप हेच उत्पत्ती कार्यरत कारखान्याला असणारे कुलूप आहे. लूप हे कुलपही आहे हे हास्य निर्मितीचे अजून एक कारण आहे. आपण उत्पन्नाच्या मानाने खर्च फार करतो व मग कर्जबाजारी होतो. तेव्हा पैशाच्या पेटीला कुलूप लावणे हे तर सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यकच आहे. उत्पन्नाच्या मानाने जपून पैसा खर्च करा, अडीअडचणींसाठी काही पैसा बचत ठेवा व शक्तीपेक्षा फार मोठे कुटुंब होऊ देऊ नका. म्हणजे सांपत्तिक स्थिती सुधारेल ही शासनाचीही भूमिका आहे. जीवनमान उंचावण्यासाठी अल्पबचत व कुटुंब नियोजन हे दोन प्रमुख मार्ग आहेत याची घोषणा वारंवार करण्यात आली आहे.

 या ठिकाणी नकळतपणे जाणवणारी अजून एक तिसरी बाब आहे. दारिद्रय रेषेखाली अगर तिच्या जवळपास असणारे जीवन जगणाऱ्या ४० टक्के लोकांना आपण काय सांगणार आहोत? दहा मुले व पती-पत्नी असे बारा जणांचे त्यांचे कुटुंब असले तरी सर्वजण अर्धपोटी, अर्धनग्न असे दरिद्रीच असणार. तीन मुले व पती-पत्नी असे हे कुटुंब पाच जणांचे असो अगर पती-पत्नी असे दोघांचे असो, त्याचे नागवेपण, त्याची उपासमार चालूच राहणार आहे आणि दोनवेळ पोटभर जेवणाससुद्धा मिळत नाही त्यांनी कुलूप तरी कशाला लावावे? म्हणून त्या दरिद्र्यांना कुलूप आणि लूप दोन्हींचा फारसा फायदा नाही. आणि जे आर्थिक दृष्टीने वरिष्ठ वर्गात आहेत त्यांनी लूप व कुलूप दोन्हीकडे दुर्लक्ष केले तरी काय बिघडणार आहे? लूप काय आणि कुलूप काय, असणाऱ्यांना त्याची गरज नाही आणि नसणाऱ्यांना त्याचा उपयोग नाही. म्हणूनच ही कविता वाचताना कुठेतरी विसंगती जाणवते ही

चौथे अपत्य / ५१