पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 निबिडातून नवी वाट घडविण्याचे जीवनाचे आव्हान जेव्हा मी स्वीकारले,

  तेव्हाच त्याची चाहूल माझ्या पाठीशी असलेली मला जाणवली.

  अपयशांनी फेसाळलेला माझा चेहरा पाहून आता मी घाबरत नाही.

  कारण जीवनाचा उबदार हात माझ्या पाठीवरून फिरतच असतो.

  कड्यावरून कोसळताना आता मला कापरे भरत नाही.

  कारण माझ्यातला सागर सतत गर्जना करीतच असतो.

  भरतीच्या लाटांनी मी जीवनाला आलिंगन देतो

 आणि ओहोटीच्या हातांनी त्याचा पदस्पर्श करतो.

 मूळच्या कवितेतील एखाद-दुसरी ओळ गाळलेला हा सलग तुकडा संपूर्ण कविता नाही काय? पण इतकेच लिहून आमटे सदैव थांबले असते तर खलील जिब्रानच्या पंक्तीत त्यांचे पान मांडता आले असते. वाङ्मयीन दु:ख हे आहे की एकनाथाप्रमाणे आमटे प्रथम ध्येयवादी प्रचारक आहेत. आपल्या जीवननिष्ठांना आकर्षकरीत्या प्रदर्शनात ठेवण्यासाठी त्यांनी स्वत:तील कवी मखर सजविणारा रंगारी म्हणून वापरला आहे या गोष्टीची नोंद वाङ्मय विवेचकांना घेणे भाग आहे.

 जीवनवादाच्या भूमिकेवरून आपण वाङमय तपासतो असा दावा करणाऱ्या खांडेकरांच्या सारख्या काही वाचकांना सुभाषितांची विलक्षण ओढ असते. जीवनाला मार्गदर्शन करणारी सूत्रमय वाक्ये हीच त्यांना काव्याची परम सीमा वाटते. अशा मंडळींच्यासाठी मुद्दाम सजविलेली वाक्ये म्हणजे काव्य. हे सजावट प्रकरण आमटे यांनी विपुल प्रमाणात हाताळले आहे. या उद्योगातून प्रचाराला उपयोगी पडणाऱ्या उंच आवाजाच्या धातूच्या घडीव घंटा जन्माला येतात. जिवंत काव्याचा पुष्पसंभार या उद्योगाने उमलत नसतो; उलट कुस्करला जातो. 'तो दिवस जवळ आहे जेव्हा किनारे जागे होतील' 'बहर लुटणाऱ्या बांडगुळांनी आणखी काही काळ खुशाल खिदळून घ्यावे' हा प्रचार झाला. क्रांती जवळ आहे हे शोषकांनो! तोवर मौज करून घ्या. हा मुद्दा वरील ओळींनी सजवलाही गेला. पण अशा सजवून मांडलेल्या विचारात निर्जीव चमकदारपणा असला तरी अनुभवाचा जिवंतपणा नसतो. कवितेच्या क्षेत्रात शिरताना प्रचारावर मखमली झूल घालण्याची ही हौस आवरली पाहिजे. प्रचारकाच्यासाठी एकच मुद्दा शंभरदा सांगणे याला महत्त्व असते, पुन्हा पुन्हा सांगण्यालाही महत्त्व असते; पण काव्यात त्याला पुनरुक्ती नावाचा दोष म्हणतात. आमटे यांच्या कवितेत ही पुनरुक्ती विपुल आहे. एक त्यांचे तुफान

२४ / थेंब अत्तराचे