घेतले तर अनेक कवितांत आढळते. अध्यात्माच्या पितळी पत्राने आपली बुरसटलेली श्रद्धा सुरक्षित करणारे अनेक कवितांत आढळते. 'जलधारांचे ताणे व नांगराच्या रेषाची बाणे घेऊन, मातीवर गर्द हिरवे महावस्त्र विणण्याची' कल्पना चांगली आहे. पण ती तीन-चार वेळा येऊन गेली आहे. अभावाची पूजा करणारे आत्मवंचक, निदान पाच-सात वेळा तरी भेटतात. कवितेला हे सारे टाळले पाहिजे. हे टाळणे आमटे यांना जमेल काय? जमावे अशी आपली इच्छा असली तरी जमणार नाही हे या प्रश्नाचे उत्तर आहे.
आमटे यांच्या डोळ्यांत भव्य स्वप्न पाहाणारी दृष्टी आहे. त्यांच्या पाठीत कधीही न वाकणारा अदम्य ईर्षेचा कणा पोलादी ताठपणाने घट्ट बसलेला आहे. त्यांच्या हातांना स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करण्याची लोकविलक्षण किमया आहे; पण त्यांच्या छातीत एक महाकवीही दडलेला आहे. ज्याचे अधून मधून दर्शन त्यांच्या कवितेत होते. आमटे यांच्या लोकविलक्षण समर्थ अशा जिद्दीच्या बेड्या या महाकवीच्या हाता-पायांत घालून, कवीचा बंदिवान करणे आमटे यांनी थांबविले पाहिजे. पण हे त्यांना जमेल काय? आमटे यांच्याच भाषेत सांगायचे, तर इथे त्यांची स्पर्धा त्यांच्या स्वत:शीच सुरू झाली आहे. त्यातील कवीवर सध्या तरी आमटे यांनी मात केली आहे. हा कवी आमटे यांच्या कचाटीतून सोडविणे त्यांचे त्यांना तरी जमेल काय?