'ज्वालामय क्षणात' शतकाचे शुक्र साठले आहेत ते क्षण कसे असतात हे सांगून आमटे थांबले असते तर ते कवी झाले असते. पण यापूर्वी असे क्षण कोणते आले याची यादी ऋग्वेदातील नासदीय सूक्तापासून आरंभ होते. ऋग्वेदानंतर रामायण आले पाहिजे. रामायणाच्या उल्लेखात क्रौंचपक्षी हवा वाल्मिकीचे नावही हवे. मग दधिचि, सावित्री, सीता, राधा, द्रौपदी, पांडव, योगेश्वर कृष्ण आणि ऊर्मिला यांना नावे घेऊन वंदन केले जाते. पुराण काळ संपल्यावर क्रमाने इतिहास सुरुवात होतो. इतिहासात बुद्ध हवा म्हणून यशोधराही हवी. या यादीत छत्रपतींचे नाव नाही, ते बहुधा चुकून राहिले असले पाहिजे. सत्तावन्नच्या स्वातंत्र्य वीरांचाही उल्लेख आलेला नाही. मग सावरकर, लो. टिळक, भगतसिंग यांच्या आठवणी होतात. कामगारांच्या प्रचंड संपाच्या व 'श्रमस्विनींच्या' आठवणी होतात. एक तर अशा शतक उजळणाऱ्या क्षणांची संपूर्ण यादी करणे शक्य नसते. दुसरे म्हणजे अशा याद्यांची काव्याला गरज नसते. काव्य हा सलग, संपूर्ण अनुभवाचा एकसंध आविष्कार असतो. केवढाही महान आणि उत्कटतेने जाणवणारा विचार असला तरी काव्य हे त्यावरचे प्रवचन नसते. हा प्रकार कोणत्याही कवितेत सापडू शकतो. 'एकलव्य' ही कविता घेतली तर या एका कवितेत एकलव्य आला आहे. त्यानंतर विष प्राशन करताना आत्म्याच्या अमरत्वावर प्रवचन करणारा सॉक्रेटिस आला आहे, न्यूटन आला आहे, आर्किमिडीज आला आहे. शेवटी , डार्विन तर यायलाच पाहिजे. हे श्रेष्ठ विज्ञानवंत संपले की त्यांच्या शेजारी संत उभे राहतात. ज्ञानेश्वर, त्यानंतर तुकाराम, मग महात्मा गांधी, साने गुरुजी ही नावे आलीच पाहिजेत. अशा नावांच्या याद्या देताना एका कवितेत व्हॅलेंटिना तेरेस्कोवा आली आहे. कानरॅड हिल्टन आला आहे. अजून एका कवितेत राम, ख्रिस्त, बुद्ध, अल्ला, ईश्वर, वेद, अवेस्ता, कुराण, पुराण आणि बायबल आले आहे. क्रांतीची पावले या कवितेत बॅस्टीलचा तुरुंग, गिलोटिन, मार्क्स, लेनिन, स्टॅलिन, माओ, हंगेरीत रशियाचा हस्तक्षेप याही बाबी झाल्या आहेत. या याद्या देणे जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आमटे कवी होऊ शकणार नाहीत. आमटे यांच्या दिव्य व्यक्तित्वाने भारून गेलेल्या अवस्थेतही हे सांगण्याइतके आपले चित्त ठिकाणावर असले पाहिजे.
कोणताही अनुभव उत्कटतेने भोगण्याची आमटे यांच्या मनाची घडण आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत विचार केवळ विचार म्हणून येतच नाहीत. चिंतनाचे रूप घेऊन, कल्पकतेचा परिवेष धारण करून, भव्य उत्कट अशा