बाबासाहेब आमटे यांच्या जवळ कवी होण्याची क्षमता असली तरी ज्याप्रकारे ते जीवन जगत आहेत ते पाहता ते कवी होण्याची शक्यता मात्र फारच कमी आहे. हे माझे विधान चमत्कारिक वाटण्याचा संभव आहे. कलावंताला लागणार मन आमटे यांच्याजवळ आहे. कर्मयोगी तर ते आहेतच. हा दुर्मिळ योगायोग मान्य करणे निराळे आणि कवी म्हणून आमटे यांना मान्यता देणे निराळे आहे. बाबासाहेबांच्या मधला कर्तव्यनिष्ठ कर्मयोगी व्याख्याने, प्रवचने दिल्याविना कधीच थांबू शकणार नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तींना इतरांना जागे करण्याचा अदम्य ईर्षा असते. समजावून सांगण्याची व पुन:पुन्हा हलविण्याची त्यांची धडपड चालू असते. कवितेच्या क्षेत्राला या बाबी मान्य नाहीत. म्हणून आमटे यांच्या कवितेत उत्कट भावनांचा, भव्य कल्पकतेचा कवी, प्रवचनाच्या मध्ये पुन:पुन्हा गुदमरून जाताना दिसतो. ही क्रिया जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत क्षमता असूनही आमटे कवी होऊ शकणार नाहीत आणि याबद्दल कोणतीही खंत वाटण्याचे कारण नाही. कारण आमटे यांनी कवी झालेच पाहिजे असा आग्रह असण्याचे कारण नाही.
आमटे यांची कोणतीही कविता जरी घेतली तरी मी म्हणतो, त्याचा प्रत्यय आल्याविना राहणार नाही. पहिलीच कविता ‘शतकाचे शुक्र' या शीर्षकाची आहे. शतकाचे शुक्र ही कल्पनाच भव्य आहे. ज्या पद्धतीने ही कविता सुरुवात होते ती पद्धत पाहिल्यावर आमटे यांच्यामध्ये एक कवी दडून आहे याविषयी शंका उरत नाही.
असे काही क्षण उजाडतात
की प्रजेचे स्वप्नात मेघ
अनोळखी दिशांनी दाटून येतात
आणि आकाशाचे आत्मसमर्पण
गार विजांच्या वेलीतून सळसळत,
मातीच्या ओढीने वाहत सुटते.
याच ठिकाणी ही कविता संपायला हवी. कारण यानंतर वरील कवितेचे स्पष्टीकरण सांगणारे व्याख्यान सुरू होते. वरच्या ओळीत अनुभवाचा सलगपणा आहे. त्यात एक सामर्थ्य आहे, तिचा एक आकार आहे हे आपण मान्य करू. पण हे काव्य पुढच्या व्याख्यानांच्या योगाने डागळून जाते. असे काही क्षण असतात इतके सांगून आमटे थांबत नाहीत. यापूर्वी असे कोणकोणते क्षण येऊन गेले याची यादी ते देत बसतात. 'भविष्यकाळाच्या गर्भधारणेसाठी' ज्या