Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३. ज्वाला आणि फुले


श्री. बाबासाहेब आमटे

 मानवी जीवनाचा नियम असा आढळून येतो की, कर्मयोगी व्यक्तिमत्त्वे एखादे भव्य स्वप्न पाहू शकतात. या स्वप्नांना साकार करण्याचा ध्यास घेऊन आपल्या सर्व शक्तींच्या चंद्रज्योती या ध्येयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेटवू शकतात. पण अशा व्यक्तींच्या जीवनास विचाराच्या प्रत्येक सूत्रावर फुलणारी कल्पकता फार क्वचित असते. वेगवेगळ्या संदर्भात जाणवणारी जीवनाच्या विविधतेची उत्कटता त्यांच्याजवळ क्वचित असते. विलक्षण जिद्दीने हे कर्मयोगी पुरुष निराशेवर मात करीत असतील, नव्या आशांनी उमलत असतील, कधी कधी मनातल्या मनात खचून जात असतील; पण आपल्याच मनाचा मागोवा घेऊन अनुभवाचे स्वरूप न्याहाळण्यासाठी लागणारी तटस्थता त्यांच्याजवळ नसते. हे साकार करण्याला समर्थ असणारी शब्दकळाही नसते. आणि जे स्वत:ची स्वप्ने पुन:पुन्हा निरखून पाहण्यातच गुंग असतात, आपले मन पुन:पुन्हा तपासून भोगलेल्या अनुभवाचा नेमकेपणा शोधण्यास गर्क असतात, त्यांच्या हातांना वास्तवात काही साकार करण्याची सवय कमी असते. कर्मयोगी कलावंत हा योग सृष्टीच्या व्यापारात म्हणूनच दुर्मिळ असतो. हा दुर्मिळ योग बाबासाहेब आमटे यांच्या रूपाने फार दिवसांनंतर मराठी वाङ्मयात साकार झाला आहे.

 बाबासाहेब आमटे महाराष्ट्रातील प्रात:स्मरणीय स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्वाच्या पैकी एक विद्यमान व्यक्ती आहेत अशी माझी धारणा आहे. जीवनाच्या ज्या क्षेत्रात त्यांनी कर्तृत्वाचे प्रासाद उभे केले आहेत ते क्षेत्र उजळून निघालेले आहे यात शंका नाही. विनोबा भावे यांच्यासारख्या तपस्वी माणसाला सुद्धा आमटे यांच्याकडे पाहून 'भगवंताला नोटीस' द्यावीशी वाटते हा त्यांच्या महान कर्तृत्वाचा विजय म्हटला पाहिजे. या दिव्य जीवनासमोर कोणत्याही क्षणी नतमस्तक होण्यात मला धन्यता वाटेल. पण एक गोष्ट स्पष्टपणे नोंदविली पाहिजे.

२० / थेंब अत्तराचे